तानाजी काळे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदापूर : विठ्ठलाच्या भेटीच्या आतूरतेने पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल झाला. शहरात प्रवेश करताच सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हरिभक्तीच्या विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरला.

वीर विठ्ठलाचे गाढे, कळिकाळ पाया पडे

करिती घोष जेजेकार, जळती दोषांचे डोंगर

क्षमा दया शांति, बाण अभंग ते हाती

तुका म्हणे बळी, तेचि एक भूमंडळी

निमगाव- केतकीतून मार्गस्थ झाल्यानंतर अखंड हरिनामाच्या गजरात ज्ञानोबा- तुकोबाच्या जयघोषात मजल दरमजल करीत हा सोहळा सोनाई उद्योग समूहाच्या प्रांगणात आला. यावेळी सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने, विष्णू कुमार माने यांच्या वतीने वारकऱ्यांना सुगंधी दूध व अल्पोपहार देण्यात आला. नंतर गोकुळीच्या ओढ्यात विश्रांती घेऊन पालखी सोहळा, छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक जहागीर असलेल्या इंदापूर नगरीत दाखल झाला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, प्रदीप गारटकर, मुकुंद शहा, भरत शहा, कैलास कदम आदींनी पालखी सोहळ्याचे परंपरेनुसार जंगी स्वागत केले. हर्षवर्धन पाटील यांनी पालखी रथाचे सारथ्य केले.

पालखी मार्गावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे रिंगण पार पाडण्यासाठी वैष्णव बांधव, वैष्णव भगिनी सज्ज झाल्या. पालखी विसावल्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. रिंगणामध्ये प्रथम वारकऱ्यांच्या पताका फडकल्या, पताकाधारी वारकरी आपले रिंगण पूर्ण करत असताना एकच लयबद्ध पताकांच्या सळसळीने जणू असंमंतही भक्तिरसात न्हाले. पाठोपाठ डोईवरी तुळशी वृंदावन सावरत वैष्णव भगिनींनी अत्यंत उत्साहाने आपले रिंगण पूर्ण केले. विणेकरी आणि पाठोपाठ पखवाज वादकांनी आपले रिंगण पूर्ण करताना, रिंगणात वेगळाच भक्तिरंग भरला. मानाच्या अश्वाने वायू वेगाने प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष करीत अश्वाच्या टापाखालील धूळ कपाळी लावली. नंतर मोहिते पाटलांच्या अश्वाने आपले रिंगण पूर्ण करताच पुन्हा हरिनामाचा गजर झाला. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी इंदापुरात गर्दी केली होती. सोहळा मुक्कामासाठी श्री. नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणामध्ये दाखल झाला. यावेळी रितीरिवाजानुसार पालखी सोहळ्याचे स्वागत व पादुकांची पूजा हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा, भरत शहा यांनी केली.

मुक्कामाचे ठिकाण कायम

यावर्षी पालखी सोहळ्याचे मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचे संकेत मिळत होते. मात्र परंपरेनुसार पालखी सोहळ्याचा मुक्काम यावर्षी नारायणदास रामदास हायस्कूलमध्येच व्हावा, अशी विनंती शहा बंधूंसह इंदापूरकरांनी केली होती. पालखी सोहळा प्रमुखांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन यावर्षी पालखी सोहळा नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये मुक्कामी आणला. पालखीचा रविवारचा मुक्कामही इंदापुरातच राहणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri sant tukaram maharaj palkhi reached in indapur for two days pune print news zws