पंढरपूर : चैत्री यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मंदिर समिती तर्फे देण्याचे नियोजन केले आहे. वाढत्या उन्हाचा त्रास दर्शन रांगेतील भाविकांना होऊ नये म्हणून पत्रा शेड, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पंखा आदी सुविधा देणार आहे. तसेच या काळत व्हीआयपी ऑनलाइन दर्शन सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. दरम्यान, चैत्री यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे एकादशी ८ एप्रिल रोजी आहे.
वारकरी संप्रदायातील महत्त्वाची आणि नवीन मराठी वर्षाच्या सुरुवातीची यात्रा म्हणजे चैत्र यात्रा. या यात्रेला प्रामुख्याने, मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्र यासह राज्यातून भाविक दरवर्षी न चुकता येतात. या यात्रेला जवळपास चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची तयारी पूर्ण झाली आहे.
आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील रेस्क्यू व्हॅन, प्रशिक्षित कर्मचाऱ्यासह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १०० सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाइल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलिसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य व्यवस्थेसाठी पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रुग्णालयामार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा व मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्ययावत रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, असे औसेकर महाराज यांनी सांगितले.
सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. याचा त्रास दर्शन रांगेतील भाविकांना होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना केल्या आहेत. पदस्पर्श दर्शन रांगेत मॅट, बसण्याची सुविधा, थंड पिण्याचे पाणी, तात्पुरते उड्डाणपूल, शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम, थेट दर्शन इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वाढती उन्हाची दाहकता लक्षात घेऊन, पत्राशेडमध्ये कुलर व फॅन बसविण्यात येत आहेत. याशिवाय, महिला भाविकांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष उभारण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. असे असले तरी उन्हाचा कडाका जरी वाढला तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनाने भाविक तृप्त होणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.