गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केली जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपा नेते अयोध्यानगरीत प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत.
शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पत्रकारावर भडकले आहेत. उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख शिवसेना असा केल्याने श्रीकांत शिंदे पत्रकारावर भडकले. ते अयोध्या येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“शिवसेनेनं अशी टीका केली आहे की, भाजपाने एकनाथ शिंदे यांना हायजॅक केलंय, भाजपाच्या पैशावर हा अयोध्येचा तमाशा सुरू आहे”, या उद्धव ठाकरे गटाकडून केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता श्रीकांत शिंदे म्हणाले, “मला वाटतं तुम्ही पक्षाचं नाव नीट घेतलं पाहिजे. आधी पक्षाचं नाव नीट घ्या, मग प्रश्न विचारा…” संबंधित पत्रकाराने उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख शिवसेना असा केल्याने श्रीकांत शिंदे पत्रकारावर भडकले.