एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार, आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिलं होतं. ‘आताही ते ( एकनाथ शिंदे ) येथे येईपर्यंत मी वाट पाहण्यास तयार आहे. मी एकटा बसतो त्यांना त्यांच्या ४० जणांच्या गटाबरोबर बसू दे. पण, ते पळून का गेले? खोटं का बोलले? बेरोजगारी, परदेश दौरे, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर समोरासमोर चर्चा करू,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“भीतीपोटी ४० लोक पळून गेले होते. काहीतरी लपवण्यासाठी ते पळून गेले. जे धीट आणि प्रामाणिक होते, ते पक्षाबरोबर राहिले. आताही ते ( एकनाथ शिंदे ) येईपर्यंत मी वाट पाहण्यास तयार आहे. मी एकटा बसतो त्यांना ४० जणांच्या गटाबरोबर बसू द्या. पण, ते पळून का गेले? खोटे का बोलले? बेरोजगारी, परदेश दौरे, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर समोरासमोर चर्चा करूया,” असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.
हेही वाचा : “बावनकुळेंचे १० खासदार आले, तरी पराभव करू शकत नाहीत”, कडूंच्या आव्हानावर भाजपा नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…
“माझ्या मुलालाही जास्त समजतं”
यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, “कुणीतरी आपल्या लायकीप्रमाणे बोलल्याचं समोर आलं. त्यांचा विचार कुठपर्यंत जातो हे पाहिलं. कुणीतरी बालबुद्धी म्हणून संबोधलं होतं. माझ्या मुलालाही जास्त समजतं. विचारांची दिवाळखोरी महाराष्ट्रानं पाहिली आहे. मुख्यमंत्री घाबरून गेले म्हणणे हे हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री गृहमंत्रालयाकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीला गेले आहेत.”
“…ते काम एकनाथ शिंदे करत आहेत”
“अडीच वर्षात मुख्यमंत्री आपल्याबरोबर चोवीस तास असायचे. म्हणून २४ तास मुख्यमंत्री घरीच बसतात, असं त्यांना वाटलं. पण, तू कोण आहे, तुला मुख्यमंत्री कशाला घाबरतील. गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री दिवस-रात्र काम करत आहेत, हे महाराष्ट्राने पाहिलं. ऑनलाईन येऊन गरम पाणी प्या, स्वत:ची काळजी घ्या, मी फक्त सल्ले देणार हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही. जमिनीवर उतरून लोकांचे अश्रू पुसण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. ते काम एकनाथ शिंदे करत आहेत,” असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा : राज ठाकरेंसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले? आदित्य ठाकरेंचं रोखठोक मत; म्हणाले, “रक्ताच्या…”
“दोन आमदारांचा बळी घेतला”
“तुमचं वय किती, बोलता किती. मुख्यमंत्र्यांची जेवढी कारकीर्द आहे, तेवढं तुमचं वय सुद्धा नाही. तुम्हाला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सर्व फुकट मिळालं आहे. दोन आमदारांचा बळी घेतला. त्यानंतर आमदार आणि मंत्री सुद्धा झालात. पक्ष वाढीसाठी काय करावं लागतं, तुम्हाला काय कळणार?” असा हल्लाबोल श्रीकांत शिदेंनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.