राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहे. एका वृत्तावाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. या विधानानंतर सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर, यावर स्पष्टीकरण देताना सत्तार यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषेचा वापर केला.
“ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांच्यासाठी मी सिल्लोडला एक दवाखाना उभारतो. या दवाखान्यात खोक्यांची आठवण येणाऱ्या नेत्यांची डोकी तपासू. त्यांचे (सुप्रिया सुळे) पतीदेव उद्योगपती आहेत. मग त्यांना (सुप्रिया सुळे) उद्योगतीचा दर्जा द्यायचा का,” असे सत्तार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “सत्तेची मस्ती जिरवणार, धडा शिकवल्याशिवाय…”;
अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त केला जात आहे. यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा बोलण्याचा उद्देश तो नव्हता,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
हेही वाचा : सुप्रिया सुळेंबाबतच्या विधानानंतर सत्तारांच्या घरावर दगडफेक, NCP कार्यकर्ते आक्रमक; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सत्तार काय म्हणाले होते?
सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर करण्यात आली होती. त्यावर तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. याबाबत औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भि*** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही खोके देऊ,” असे उत्तर सत्तार यांनी दिले.