महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अलीकडे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल विधान केलं. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, येत्या काळात शिंदे गटाचे आमदार कदाचित भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, असा दावा जयंत पाटलांनी केला.
जयंत पाटलांच्या या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. स्वत:च्या पक्षाची काळजी करा, येणाऱ्या काळात काहीही घडू शकतं, असं सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “आता शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष झालं आहे. पण विरोधकांना त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा चघळायच्या आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. विरोधक ‘शासन आपल्या दारी’ या योजनेवरही टीका करत आहेत. यांचं शासन कधी लोकांच्या दारी गेलं नाही. हे घरात बसूनच काम करत होते. त्यांचं सरकार म्हणजे ‘शासन आपल्या घरी’ असं बोललं तरी चालेल.”
हेही वाचा- भाजपा-शिंदे गटाच्या वादावर जयंत पाटलांचं भाष्य; म्हणाले, “भाजपाने एकनाथ शिंदेंसमोर गुडघे…”
“कुणीतरी आमच्या चिन्हाबद्दल बोलतंय. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही आपली काळजी करा. आपल्या पक्षाची काळजी करा. येणाऱ्या काळात अजून काही घडू शकतं, याची काळजी करा,” असं सूचक वक्तव्यही शिंदेंनी यावेळी केलं.
तुम्ही सूचक वक्तव्य करताय म्हणजे भविष्यात काहीतरी घडेल का? असं विचारलं असता खासदार शिंदे म्हणाले, “म्हणूनच बोलत आहे. त्यांनी आपल्या पक्षाची काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या काळात काहीही घडू शकतं. ते (जयंत पाटील) कुठल्या चिन्हावर लढणार आहेत. त्यांच्या पक्षात लोक राहणार आहेत की नाही? ते कुठल्या पक्षात जाणार आहेत? याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आमच्या लोकांचा विचार करण्याची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत.