कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा आमने-सामने आला आहे. लोकसभेला कल्याण-भिवंडी मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
“कल्याण-भिवंडी मतदारसंघात लोकसभेला जे भाजपाचे उमेदवार उभे राहतील, ते निवडून येतील,” असं विधान भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं. यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, “कोण कुठून लढणार हे ठरविण्यासाठी वरिष्ठ सक्षम आहेत. वक्तव्य केल्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही, हे काहींना माहिती आहे.”
“मनोरंजनाच्या दृष्टीनं या वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे. यापूर्वीही अशी वक्तव्ये करण्यात आली होती. पण, ती मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. कुणी टीका केली, तर त्यांच्यावर टीका करण्यास मला वेळ नाही. आपला वेळ जनतेसाठी वापरला पाहिजे,” असेही श्रीकांत शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा : चव्हाण-शिंदेंच्या मनोमिलनामुळे डोंबिवलीतील विकासकामांना चालना
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभेतील पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता.