शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ( १३ जानेवारी ) कल्याण-डोबिंवली मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी “निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली, ही माझी चूक होती,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. याला श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तेच-तेच शब्द आणि टोमण्याचा लोकांना कंटाळा आला आहे,” असा टोला श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“आता गद्दरांची घराणेशाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राणप्रिय वाटू लागली आहे. पण, कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांची घराणेशाही गाडायची आहे. गद्दारी आणि घराणेशाही लोकसभेत नाही तर विधानसभेतही गाडावी लागणार आहे. काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते. कारण, निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली. ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधरायची आहे. मीही सुधारणार आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदेंवर टीकास्र डागलं होतं.

“निराशेच्या गर्तेत पातळी सोडून भाष्य केलं जातं”

यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदेंनी म्हटलं, “तेच-तेच शब्द आणि टोमण्यांचा लोकांना कंटाळा आला आहे. लोकांना काम हवं आहे. त्यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची कमी होती. आम्हाला सांगितलं असतं, तर कार्यकर्ते पाठवले असते. निराशेच्या गर्तेत पातळी सोडून भाष्य केलं जातं. आम्ही कधीही पातळी सोडून वक्तव्य करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्हाला शिकवण आहे. नाहीतर काहीजणांचे सकाळी उठल्यापासून शिव्या-टोमणे सुरू असतात.”

“…याचा बोध उद्धव ठाकरेंना घेतला पाहिजे”

“गद्दार, खोके, खंजीर, चोर… हे सोडून दुसरं काहीतरी करायला पाहिजे. लोक २४ तास काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर की करोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून स्वत:ला बंद करणाऱ्यांबरोबर राहतात, याचा बोध उद्धव ठाकरेंना घेतला पाहिजे”, असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला आहे.

हेही वाचा : “पंतप्रधान गद्दारांच्या घराणेशाहीवर बोलले नाहीत”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

“आमच्याकडे घराणेशाही नाही”

“२०१४ साली कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार मिळत नव्हता. उमेदवार पक्ष सोडून गेल्यानंतर लोकसभेची जाग कशी निवडून येईल, हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मला निवडणुकीसाठी उभं केलं. पण, उद्धव ठाकरेंनी आपल्या घरातील कुठल्या तरी व्यक्तीला उभे करण्याचा विचार नाही केला. आमच्याकडे घराणेशाही नाही. पक्षाला गरज लागल्यावर आम्ही उभे राहिलो. विपरीत स्थितीत कल्याणची जागा निवडून आणली,” असं श्रीकांत शिंदेंनी सांगितलं.

हेही वाचा : “घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान”, पंतप्रधानांच्या विधानावर उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देत म्हणाले, “घरंदाज माणसानं…”

“एकनाथ शिंदे आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत”

“घराणेशाहीचं बोलायचं झालं, तर वरळीची जागा निवडून आणण्यासाठी दोन आमदारांचा बळी घेतला. लोकांमधून निवडून येणाऱ्या दोघांना विधानपरिषदेवर घेतलं. पक्षप्रमुखपद, युवासेना प्रमुखपद ही तुमच्याकडे आहे. अशा गोष्टी आमच्याकडे नाही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. मीही कुठले पद घेणार नाही,” असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrikant shinde reply uddhav thackeray over kalyan dombivali loksabha constituency ssa