कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राजकीय खेळी खेळली आहे. तर,महायुतीने ही जागा शिंदे गटाला सोडून श्रीकांत शिंदे यांना संधी दिली आहे. वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे यांच्यात ही खरी लढत होणार आहे. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैशाली दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाची उमेदवारी उशिराने जाहीर झाली असली तरीही निवडणुकीसाठीची तयारी पक्षाने आधीपासूनच सुरू केली होती. आम्ही फक्त उमेदवार घोषित होण्याची वाट पाहत होतो, असं वैशाली दरेकर म्हणाल्या.
दरम्यान, आता दोन्ही पक्षाकडून उमेदवार जाहीर झाले असल्याने प्रचारांना सुरुवात होणार आहे. याबाबत वैशाली दरेकर म्हणाल्या की, “आम्ही आताही चौक सभेला तयार आहोत. आमच्यातील प्रत्येक माणूस बोलणाऱ्यातला आहे. एकवेळ चौक कमी पडतील पण माणसं कमी पडणार नाहीत”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >> कल्याण लोकसभेतील तुल्यबळ लढतीत आम्ही लढणार आणि जिंकणार पण, उबाठा पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा विश्वास
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी यापूर्वी आम्ही जीवाचे रान केले आहे. त्यामुळे येथील प्रत्येक शिवसैनिक, कार्यकर्ता हा निष्ठावान आहे. या निष्ठावान शिवसैनिकांच्या ताकदीने कल्याण लोकसभेतील प्रचाराला आम्ही सुरुवात करू. एक दिलाने काम करून जिंकून येऊ, असं वैशाली दरेकर यापूर्वी बोलल्या होत्या.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात यापूर्वी प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. शिवसैनिक, महिला संघटना आपल्या पद्धतीने प्रचार कार्य करत आहेत. यापूर्वी फक्त उमेदवार नक्की नव्हता. आता आपले नाव जाहीर झाल्याने आपल्या नावाने या मतदारसंघात जोमाने प्रचार कार्य सुरू होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
कोण आहेत वैशाली दरेकर?
पूर्वाश्रमीच्या मनसेच्या नगरसेविका राहिलेल्या दरेकर त्याच पक्षाकडून २००९ साली लोकसभा निवडणुकही लढल्या होत्या. कल्याण डोंबिवलीत पालिकेत डोंबिवली विभागातून गोग्रासवाडी भागातून वैशाली दरेकर यांनी मनसेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले. त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती पद त्यांनी भुषविले होते.