कराड : साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी पाटील यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अगदीच खालावली. आणि आज शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रत्येकाशी अत्यंत आपुलकी व प्रेमाने वागणे हा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांना सर्वजण माई म्हणून आदराने ओळखत. चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील बर्गे कुटुंबात २६ जुलै १९४८ रोजी रजनीदेवी यांचा जन्म झाला. श्रीनिवास पाटील यांच्याशी त्या १६ मे १९६८ रोजी विवाहबद्ध झाल्या. पतीच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम त्यांना सोबत दिली. त्यांच्या पार्थिवावर कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – अटल सेतूच्या शुभारंभाला रामाचा नारा, विकास प्रकल्पातून महायुतीची हिंदुत्वाची पेरणी
हेही वाचा – पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजितदादा गटाला होर्डिंगवर मानाचे स्थान
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक कार्यामध्ये अतिशय हिरीरीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या रजनीदेवी तथा माई आदर्श संस्कारित अन् एक धार्मिक गृहिणी होत्या. उच्चशिक्षित असूनही जुन्या रुढी परंपरा, संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.