अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी श्रीरामपुरातील गुन्हेगारी विश्व पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आले असून, येथील दोघा गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणातील आरोपीच्या रेखाचित्राशी मिळत्याजुळत्या दिसणा-या एका साईभक्ताला बुधवारी पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले. प्राथमिक चौकशीत त्याचा हत्येशी संबंध नसल्याचे आढळून आले. मात्र त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने मंगळवारी श्रीरामपूर शहरातील अट्टल गुन्हेगार चन्या ऊर्फ सागर बेग यास ताब्यात घेतल्याचे समजते. बेग याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, महिलांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने चोरी, खंडणी, सुपारी घेऊन खून करणे आदी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तो अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा आहे. नाशिक व नगरचे पोलीस एक वर्षांपासून त्याच्या मागावर होते, पण तो आता सापडला. स्थानिक पोलिसांना त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. नातेवाइकांनी मात्र चन्याला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण त्याचा डॉ. दाभोलकर हत्येशी संबंध नसल्याचे सांगितले. शहरातील गोंधवणी भागातील आणखी एका गुन्हेगारालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अजून तरी दोघांचाही खूनप्रकरणाशी संबंध असल्याचे आढळून आले नाही. शिरसगाव येथीलही काही गुन्हेगारांची चौकशी पथकाने केली. बेग याचे वास्तव्य नाशिक येथे गेल्या काही वर्षांपासून आहे. आज तरी पोलीस त्याच्याबद्दल कोणतीही माहिती द्यायला तयार नाही.
दरम्यान, शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी कर्नाटकातील फिरदोसनगर (जिल्हा कप्पल) येथील आसीफ अब्दुल काझी हा साईभक्त आला होता. त्याला एक क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ लोकांनी पाहिले. डॉ. दाभोलकरांच्या हत्याप्रकरणातील आरोपीच्या रेखाचित्राशी मिळताजुळता चेहरा या साईभक्ताचा दिसत होता. वाहतूक शाखेचे निरीक्षक अरिवदे भोळे यांना ही माहिती देण्यात आली. भोळे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे वागणे असंबद्ध होते, तसेच दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या रेखाचित्राशी ९० टक्केत्याचा चेहरा मिळताजुळता होता. त्यामुळे त्याला शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भोसले यांच्या ताब्यात देण्यात आले. आज या साईभक्ताची नगरचे पोलीस अधीक्षक रावसाहेब िशदे यांनी स्वत: चौकशी केली. चौकशीत त्याचा हत्येशी संबंध असल्याचे आढळून आले नाही. मात्र त्याला हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या पथकाच्या हवाली केले जाणार आहे.
श्रीरामपूर शहरात गुन्हेगारांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात आहे. खिसेकापू, सुपारी घेऊन खून करणे, फसवणूक, लूटमार, रस्तालूट आदी गुन्हे करणारे आरोपी शहरात राहतात. त्यांच्या शोधासाठी नेहमीच देशभरातून पोलीस येथे येत असतात. शहरात ते गुन्हे करत नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून कारवाई होत नाही. गुन्हेगारांसाठी शहर आश्रयस्थान बनले आहे. आता चौकशीच्या जाचामुळे अनेक गुन्हेगारांनी शहर सोडले आहे. तर चौकशीमुळे एक फरार आरोपी मात्र पोलिसांच्या जाळय़ात अडकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा