रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून या मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीरंग गोडबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर २५ जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यांमध्ये पुण्याच्या दीपक रेगे यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभागाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ (डब्ल्यू) (डब्ल्यू ए) (३) नुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाकडून रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करुन सार्वजनिक करमणूकीच्या जागी प्रयोग सादर करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येते. संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी साहित्य, कला क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ लोकांची निवड केली जाते.
दरम्यान, मंडळाच्या २२ मे २०१८ रोजी झालेल्या नियुक्त्या १८ जानेवारी २०२० रोजी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानतंर या मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयानुसार, मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची फेरनियुक्ती करुन मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी – श्रीरंग गोडबोले, सदस्यपदी – सतीश पावडे, भालचंद्र कुबल, महेंद्र कदम, वृंदा भरुचा, गौरी लोंढे, जयंत शेवतेकर, रमेश थोरात, दीपक रेगे, प्रविण तरडे, महेश पाटील, विजय चोरमारे, चंद्रकांत शिंदे, सुनिल ढगे, संपदा कुलकर्णी, प्रभाकर दुपारे, दिलीप कोरके, किशोर आयलवर, लिना भागवत, अनिल दांडेकर, दिलीप ठाणेकर, सतिश लोटके, स्मिता भोगले, मधुकर नेराळे, प्रदीप कबरे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मंडळावरील सदस्यांची नियुक्ती शासनाच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे, असे शासन आदेशात म्हटले आहे.