शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला कुणाला परवानगी मिळणार? यासंदर्भात न्यायालयातील सुनावणीची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, त्यातच आज सकाळपासून एका फोटोवरून राजकीय वर्तुळात नवी चर्चा पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. मागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असा बोर्ड असताना पुढे खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे हाकतात का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी त्या फोटोसंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे त्या फोटोमध्ये?
या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे कार्यालयात बसले असून त्यांच्या खुर्चीच्या मागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असा बोर्ड दिसत आहे. तसेच, त्यांच्यासमोर टेबलाच्या या बाजूला काही लोक उभे असून श्रीकांत शिंदे काही कागदपत्र तपासत असल्याचं दिसत आहे. हा फोटो मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला असल्याचा दावा रविकांत वरपे यांनी केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेससोबतच शिवसेनेकडूनही तोंडसुख घेण्यात आल्यानंतर त्यावरून श्रीकांत शिंदेंनी खुलासा करत नेमकं कारण सांगितलं आहे.
“तो फोटो आमच्या घरातला”
श्रीकांत शिंदेंनी खुर्चीमागे तो बोर्ड होता, याची आपल्याला कल्पनाही नव्हती, असं म्हटलं आहे. “आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एक व्हीसी आहे. त्यासाठी ती व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठीच एखाद्या अधिकाऱ्यानं मागच्या बाजूला बोर्ड आणून ठेवला असेल. पण तो बोर्ड तिथे असेल, याची मला कल्पनाही नव्हती. हे आमचं घर आहे. या घरातून समस्या सोडवण्याचं काम वर्षानुवर्ष होतंय. ही व्यवस्था तात्पुरती करण्यात आली होती”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
“बाहेर मुख्यमंत्र्यांचा बोर्ड लावला आहे. तिथे जर मी बाजूला जाऊन उभा राहिलो, तर त्यातूनही कदाचित वेगळा अर्थ काढला जाईल. यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
“ती खुर्ची माझीच”
“हे सगळं हास्यास्पद आहे. हा फोटो सगळीकडे शेअर केला जात आहे. ज्या कार्यालयातला फोटो व्हायरल होत आहे, ते आमचं ठाण्यातल्या घरातल्या कार्यालयातला फोटो आहे. ती माझीच खुर्ची आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून लोक आम्हाला इथेच भेटायला येतात. मी किंवा एकनाथ शिंदे, आम्ही दोघं या ऑफिसचा वापर करतो. हे घर शासकीय घर नाही. मी वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो असं नाही. पण यातून बदनाम करण्याचं काम केलं जात आहे”, असंही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
“या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील”
दरम्यान, झालेला प्रकार अनावधानाने झाला असेल, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. “या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील. पण या गोष्टी फुगवून ते शासकीय निवासस्थान, मुख्यमंत्र्यांची खुर्ची असल्याचं सांगितलं. मी दोन टर्म खासदार आहे. मला माहिती आहे की कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं”, असं ते म्हणाले.
“एकनाथ शिंदेंचं काम पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच या भीतीने एखादा फालतू मुद्दा उचलून लोकांसमोर नेला जात आहे. लोक सुज्ञ आहेत. कोण काय करतं हे लोकांना माहिती आहे. आधीचा अनुभव लोकांना आहे. आत्ताचाही अनुभव लोकांना आहे. त्यामुळे आपण काहीही केलं, तरी लोकांना कुणी फसवू शकत नाही”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना लक्ष्य केलं.
“राजकारणात प्रत्येकजण इतरांच्या छोट्या-मोठ्या चुका बघत असतो. आपण आपलं काम करायचं असतं. आपल्याला दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. कोण काय म्हणतं, याकडे लक्ष देत बसलो, तर आपण आपलं काम करू शकणार नाही”, असंही ते म्हणाले.