नाशिक शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटात द्वंद्व निर्माण झालं होतं. ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, शुभांगी पाटील यासुद्धा या उमेदवारीसाठी अडून बसल्या होत्या. त्यामुळे त्या पक्षात बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. परंतु, शुभांगी पाटील यांनी आता मोठा खुलासा केला आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत आमदार किशोर दराडे हे पक्षीय कामात व लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारातही सक्रिय न राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसचे पदाधिकारी ॲड. संदीप गुळवे यांना पक्षात प्रवेश देत या मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. शनिवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे काँग्रेसचे पदाधिकारी ॲड. संदीप गुळवे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातून गेल्या वर्षी पराभूत झालेल्या शुभांगी पाटील यांनाही शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. परंतु, त्यांना ही संधी नाकारण्यात आली. त्यामुळे त्या बंडखोरीच्या तयारीत होत्या, अशी चर्चा आहे. तसंच, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी त्या आज अर्ज भरायलाही जाणार होत्या. परंतु, त्याआधी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

हेही वाचा >> नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाकडून संदीप गुळवे निश्चित; किशोर दराडेंना शह देण्याची तयारी

याबाबत शुभांगी पाटील म्हणाल्या, “मी आज नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज भरणार होते. परंतु, त्याआधी मला उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं. मी आधीच ठरवंल होतं की ठाकरेंना विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यामुळे आज त्यांची भेट घेतली. भेटीत चर्चा झाली असून मी आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे निर्णय घ्यायला तयार आहे.”

नाशिकमधून संदीप गुळवे यांना का संधी दिली?

या मतदारसंघात गतवेळी शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे हे विजयी झाले होते. त्यांचे बंधू नरेंद्र दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. नरेंद्र दराडे पक्षात सक्रिय असले तरी किशोर दराडे हे अलिप्त राहिले. जानेवारीत शिवसेनेचे नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. अधिवेशन व सभेतही किशोर दराडे आले नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून ते अलिप्त राहिले. ठाकरे गटाच्या कार्यक्रमात सहभागी न होणारे किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात मात्र दृष्टीपथास पडत होते, याकडे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी लक्ष वेधले. त्यांची कार्यपध्दती लक्षात घेऊन ठाकरे गटाने या जागेवर पर्यायी उमेदवाराची चाचपणी केली. त्या अनुषंगाने गुळवे यांचा पक्ष प्रवेश पार पडला.