काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालावर अनेकांचं लक्ष आहे. अशातच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे बंडखोर भाचे सत्यजीत तांबे यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये चौथीच्या मुलांनी मतदान केल्याचा आरोप होतोय. यावर महाविकासआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या बुधवारी (१ फेब्रुवारी) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.
शुभांगी पाटील म्हणाल्या, “मला किती मतदान झालं हे मला पाठ आहे. कारण मी गेल्या १० वर्षांपासून याच जनतेत फिरत आहे. त्यामुळे मला किती मतदान होईल याचा मतदारही माझा पाठ होता. कोणी काहीही सांगितलं तरी ते मतदान मला झालं आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये चौथ्याच्या मुलाने मतदान केलं की, कोणी केलं हे मला माहिती नाही. पदवीधर मतदार माझा पाठ आहे. म्हणून विजय माझाच होणार आहे.”
“अनेक ठिकाणी माझे बुथही लागले नव्हते हे मला माध्यमांमधूनच कळालं”
“अनेक ठिकाणी माझे बुथही लागले नव्हते हे मला माध्यमांमधूनच कळालं. माझा बुथ प्रत्येक ठिकाणी होता. काही ठिकाणी दोन लोकं असतील, मात्र प्रत्येक ठिकाणी बुथ लागला होता. मी मोठ्या फरकाने विजय होईल. मी नावानिशी कुठं किती मतदान झालं हे सांगू शकेन” असं मत शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलं.
“मी बुथनुसार कुठे किती मतदान झालं हे सांगू शकते”
“चाळीसगावमध्ये किती झालं, खांदेशात किती झालं, नगरमध्ये किती झालं, नाशिकमध्ये किती मतदान झालं हे मी बुथनुसार सांगू शकते. काहीही सांगितलं तरी मतदार माझा होता. एवढं प्रेम जनतेने कोणावरच केलं नसेन, जेवढं माझ्यावर केलं,” असंही शुभांगी पाटलांनी नमूद केलं.
“पैशाने बलाढ्य असून उपयोग नाही”
तुमच्यासमोर सत्यजीत तांबेंसारखे बलाढ्य उमेदवार होते असा मुद्दा उपस्थित झाल्यावर शुभांगी पाटील म्हणाल्या, “पैशाने बलाढ्य असून उपयोग नाही. कामाने बलाढ्य असायला हवं आणि कामाने बलाढ्य मीच आहे.”
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलन का करणार?
विशेष म्हणजे शुभांगी पाटील निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलन करणार आहेत. याविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या, “अनेक प्रश्न मोठ्या काळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे एक एक दिवस वाया जाणं मला योग्य वाटत नाही. पदवीधर अनेक प्रश्नांनी ग्रासलेला आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी एक एक दिवस महत्त्वाचा आहे.”
हेही वाचा : MLC Election Result : मोठी बातमी, नागपुरात भाजपला धक्का; मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी
निकाल लागण्याआधीच आंदोलनाचा इशारा का?
“मी आज आंदोलन करत नाहीये. मी गेल्या चार वर्षांपासून पदवीधरांच्या प्रश्नावर काम करत आहे. तेव्हापासून मी सांगितलं होतं की, जेव्हा मी विजयी होईल तेव्हा मी विजयाची रॅली काढणार नाही, तर आंदोलनाची रॅली काढेन. हे मी आधीपासून सांगत होते, कारण प्रश्न फारच जटील आहेत. जनतेने त्यासाठीच निवडून दिलेलं असतं. निकाल लागला की, मी लगेच आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाणार आहे,” असं शुभांगी पाटील यांनी नमूद केलं.