शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज कोल्हापुरातून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून महिलांबाबत केलेल्या विधानांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी भाजपाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आदि नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्या कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, सध्याच्या सरकारमध्ये महिलांचा कशा पद्धतीने अपमान केला जातो, ते अत्यंत वाईट आहे. सोलापूरचा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांसोबत एका महिलेनं हॉटेलमधून व्हिडीओ जारी केला होता. त्या व्हिडीओमध्ये संबंधित महिला स्वत:चं नाव सांगतं होती, संबंधित जिल्हाध्यक्षांचं नाव सांगत होती. त्यांच्या दोघांत काय नातं आहे? त्याचा खुलासा करत होती, हा माणूस अत्यंत नीच आहे, असंही ती महिला म्हणत होती. पण भारतीय जनता पार्टीने त्याच्याविरोधात विनयभंगाचा किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही.
“शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही असाच प्रकार केला. एका महिलेनं राहुल शेवाळेंसोबतचा लिफ्ट, मॉल आणि हॉटेलमधील विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल केले. तसेच राहुल शेवाळेंपासून आपल्या जीवाला धोका आहे, असंही त्या म्हणाल्या. पण देवेंद्रभाऊंना त्याबद्दल काहीच वाटलं नाही. या लोकांची महिलांबद्दल काय मानसिकता आहे, हे यातून दिसतं” अशी टीका अंधारेंनी केली.
फडणवीसांनी कोणतीच कारवाई न केल्याने संबंधित नेत्यांची हिंमत वाढली. याचा परिणाम असा झाला की, गुलाब पाटलांचा सरंजामी माज उफाळून आला. गुलाबराव पाटलांना वाटलं की, देवेंद्रभाऊ तर काहीच करत नाही. त्यांनी आम्हाला आता मोकाटच सोडून दिलंय. बायकांना बोललल्यावर देवेंद्रभाऊंना जणूकाही फारच छान वाटतंय. त्यामुळे आपण काहीही बोलू शकतो. असा विचार करून गुलाबराव पाटील माझ्यावर घसरले. अर्थात त्यांचं माझ्यावर घसरणं मी फार सहज घेतलं. माणूस बावचळल्यावर असं करतो, असं समजून मी सोडून दिलं” अशी टोलेबाजी सुषमा अंधारेंनी केली आहे.