अफूवर ज्याप्रमाणे बंदी आणली गेली, त्याप्रमाणे इंग्रजी भाषेच्या शाळांवर बंदी आणली पाहिजे, अशी रोखठोक मागणी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी येथे केली. इग्रजी भाषेच्या वाढत्या वर्चस्वास साम, दाम, दंड पद्धतीने विरोध करण्यासाठी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. mh01 येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आनंद अ‍ॅग्रो ग्रुप प्रस्तुत गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात नेमाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे आहे. कळवण तालुक्यातील भास्कर व सरस्वती गुंजाळ या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी संपूर्ण साहित्यप्रेमींनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. या वेळी नेमाडे यांनी विविध विषयांवर मत मांडले.
इंग्रजी भाषेच्या वाढत्या वर्चस्वास विरोध करताना इंटरनॅशनल शाळांमध्ये मुले काय शिकतात याचा थांगपत्ता लागत नसल्याचा टोमणाही त्यांनी हाणला. प्राकृत भाषा ही मराठीची जननी असून बोली भाषांना महत्त्व देणे आवश्यक आहे. ब्राह्मणी वर्चस्ववादामुळे आपणांमध्ये आपण बोलतो ती मराठी भाषा अशुद्ध आहे की काय, असे वाटते. परंतु तसे काहीही नाही. आई लहानपणापासून मुलांना जे शिकविते ते खरे चिरंजीव साहित्य होय, असा आईच्या संस्कारांचा त्यांनी गौरव केला. या वेळी प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रांतील १४ जणांना पुरस्कार देण्यात आले. त्याचा उल्लेख करत हा खरा मातीतील माणसांचा गौरव होय, असे नेमाडे यांनी नमूद केले. मातीतील माणसांचा क्वचितच गौरव होतो. त्यापेक्षा शहरी वृत्तीकडे अधिक लक्ष दिले जाते. खरे तर शेती हा सर्वश्रेष्ठ व्यवसाय आहे. शहरी नोकरदार ठरावीक तासांपुरते काम करतात, परंतु शेतात संपूर्ण कुटुंबास चोवीस तास काम करावे लागते. त्यामुळेच शहरातील नोकरदारांना विशेष असा ‘शेती कर’ लावण्याची गरज त्यांनी मांडली.

Story img Loader