शिवसेनेचे नेते, मुख्य प्रवक्ते, सामनाचे कार्यकारी संपादक, राज्यसभेतील खासदार अशा वेगवेगळ्या भूमिकेत वावरणारे संजय राऊत सातत्यानं राज्याच्या राजकारणातील चर्चेच्या वर्तुळात असतात. राज्याच्या सत्तास्थापनेवेळी सर्वाचं लक्ष वेधून घेणारे खासदार संजय राऊत कंगना रणौतवर केलेल्या टीकेवरून चर्चेत आले. त्यामुळे प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरानं ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुणालची इच्छा संजय राऊत यांनी पूर्ण केली असून, लवकरच ही मुलाखत होणार आहे.
शिवसेनेची भूमिका मांडण्यामुळे सातत्यानं चर्चेत राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यासंदर्भात कुणाल कामरानं एक ट्विट केलं होतं. “संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन. अन्यथा काही शक्यता नाही,’ असं कुणाल कामरा म्हणाला होता. कुणाल कामरानं दिलेलं मुलाखतीचं निमंत्रण संजय राऊत यांनी स्वीकारलं आहे. लवकरच ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टच्या मुलाखतीचं चित्रीकरण खारमधील स्टुडिओत केलं जाणार आहे. या मुलाखतीसंदर्भातील वृत्त स्वतः संजय राऊत यांनीही रिट्विट केलं आहे.
कुणाल कामराच्या या शोमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या व सध्याच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, सचिन पायलट यांसह अनेक मोठी मंडळी सहभागी झालेली आहेत. काही महिन्यांपूर्वी कुमालनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनादेखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.