सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी बेकायदा ठरवून पाडून टाकल्याचा रोष सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींना पत्करावा लागत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख या तिघाजणांना काळे झेंडे दाखवून सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाचा निषेध नोंदविण्यात आला.
गेल्या १५ जून रोजी सिध्देश्वर कारखान्याची ९२ मीटर उंचीची चिमणी बेकायदेर ठरवून सोलापूर महापालिकेने पाडली होती. त्यामुळे कारखान्याच्या ३८ मेगावाट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प बंद पडला असून कारखान्याचे पुढील सलग दोन गळीत हंगामही सुरू होणे अशक्य आहे. यात सुमारे दीड हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे म्हणणे आहे. कारखान्याचे सुमारे २७ हजार ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि सुमारे १२०० कामगारांचे भवितव्यही धोक्यात आले आहे.
या कारवाईमागे भाजपच्या एका आमदाराने कुटील राजकारण खेळल्याचा आरोप कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी स्वतः केला आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे शेतकरी सभासदांसह वीरशैव लिंगायत समजात भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात रोष वाढत अहे. कारखान्यापासून जवळच असलेल्या कुंभारी गावात त्याची प्रचिती आली. भाजपच्यावतीने शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यासाठी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींसह आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार सुभाष देशमुख हे मोटारीने आले. तेव्हा स्थानिक शेतक-यांसह युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या तिन्ही लोकप्रतिनिधींना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. युवक काँग्रेसचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रोहित बिराजदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.