माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (MPCB) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियमांनुसार पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या किंवा पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था/संघटनेत २५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाते. त्यामुळे सिद्धेश कदम यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात खरंच इतकं काम केलं आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहेत.
सिद्धेश कदम यांचे वडील माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे सध्या सरकार आणि भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने भाजपाविरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे रामदास कदम यांची नाराजी दूर करण्यासाठीच त्यांच्या मुलाला हे पद दिलं असल्याचं बोललं जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने सहा मार्च रोजी एक अधिसूचना जारी करून आयएएस अधिकारी ए. एल. जरहाद यांना एमपीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. त्यांच्या जागी आता सिद्धेश कदम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जरहाद हे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कार्यालयात गेले नाहीत, असं कारण सरकारने दिलं आहे. ७ सप्टेंबर २०२१ पासून ते या पदावर काम करत होते. दी इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांत २५ वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या व्यक्तीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करायची असेल तर त्या अधिकाऱ्याने सचिव किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावर काम केलेलं असायला हवं.
हे ही वाचा >> “आम्हाला कमी लेखू नका”, छगन भुजबळांचा भाजपाला इशारा; जागावाटपाबाबत एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…
रामदास कदमांची नाराजी
महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून रस्सीखेच चालू आहे. जागावाटपाबाबत ज्या बातम्या आणि आकडेवारी (जागावाटपासंदर्भातील वेगवेगळे फॉर्म्युले) समोर येत आहेत त्यावरून शिवसनेच्या गोटात संतापाचं वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनीदेखील भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केला आहे. अशातच, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. कदम म्हणाले, भाजपाने केसाने गळा कापू नये, अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवावं.