सोलापूर : सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सोहळा येत्या १६ नोव्हेंबर रोजी आयोजिला असून यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ५० वर्षांपूर्वी या बँकेची मुहूर्तमेढ शरद पवार यांच्या हस्ते आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रोवण्यात आली होती. आज ५० वर्षांनंतर पुन्हा या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न होत आहे. बँकेच्या प्रगतीच्या या ऐतिहासिक टप्प्यावर हा एक दुर्मीळ योग साधला गेला आहे.
बँकेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याची माहिती बँकेचे अध्वर्यू राजशेखर शिवदारे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. हुतात्मा स्मृतिमंदिरात सकाळी अकरा वाजता आयोजिलेल्या या सोहळ्यास राष्ट्रीय नागरी बँक्स महासंघाचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री दिलीप सोपल, सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्थिती राहणार आहे.
हेही वाचा – “…तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा”, ‘त्या’ टीकेवरून मनसेचं भाजपाला प्रत्युत्तर
दिवंगत सहकार नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार वि. गु. शिवदारे यांनी १८ नोव्हेंबर १९७४ रोजी सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रोवली होती. गेल्या पाच दशकांच्या प्रगतीचा प्रवास दिमाखात पूर्ण करून जिल्ह्यातील एक अग्रणी बँक म्हणून आपली ओळख आणि प्रतिष्ठा बँकेने जपली केली आहे. सध्या बँकेच्या एकूण ठेवी ४६० कोटी रुपये तर एकूण कर्ज वितरण ३१० कोटी रुपये मिळून मिश्र व्यवसाय ७७० कोटींचा झाला आहे. बँकेच्या सोलापूर शहर आणि जिल्हा तसेच पुणे, लातूर, उदगीर शहरात मिळून एकूण १६ शाखा आहेत. यूपीआय आणि मोबाईल बँकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया चालू असून सुवर्ण महोत्सवी वर्षांत याची पूर्तता होईल, असे राजशेखर शिवदारे यांनी सांगितले.