सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेस मंगळवारी सकाळी नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला. साडेआठशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी सोलापूरच्या पंचक्रोशीत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यात आला. यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण व आंध्र प्रदेशातून भाविक दाखल होत आहेत.
उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठातून सकाळी साडेआठच्या सुमारास उंच नंदीध्वजांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. काशीच्या जंगमवाडी पीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या उपस्थितीत मानकरी राजशेखर हिरेहब्बू व सुधीर देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांचे पूजन झाले. काल सोमवारी रात्रभर मानाच्या दोन नंदीध्वजांना साज चढविण्यात आला. उर्वरित पाच नंदीध्वज सकाळी हिरेहब्बू मठात आणले गेले. मिरवणुकीला सुरुवात होताना यात्रेचे मानकरी असलेले सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे, महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आदींची उपस्थिती होती. मिरवणुकीत हिरेहब्बू मंडळींनी मानाचा योगदंड हातात धरला होता. विविध पारंपरिक मार्गावरून वाजत-गाजत ही मिरवणूक दुपारी सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली. सिद्धेश्वर महाराजांच्या मूर्तीला तैलाभिषेक झाल्यानंतर ही मिरवणूक शहराच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाली. सात नंदीध्वजांमध्ये मानाचा पहिला नंदीध्वज सिद्धेश्वर देवस्थान समितीचा, दुसरा देशमुख घराण्याचा आहे. तर तिसरा नंदीध्वज लिंगायत माळी समाजाचा, चौथा व पाचवा विश्व ब्राह्मण समाजाचा तर सहावा व सातवा नंदीध्वज मातंग समाजाचा असतो.
हलग्यांचा दणदणाट, संगीत बॅन्ड पथकांचे सुमधूर संगीत निनाद, सनई-चौघडय़ांचा मंगलस्वर आणि सिद्धेश्वर महाराजांचा होणारा जयजयकार अशा उत्साही व भक्तिमय वातावरणात मिरवणूक सोहळा सुरू होता. नंदीध्वजांच्या मानकऱ्यांसह हजारो भाविकांनी पूर्वापार परंपरेनुसार पांढरेशुभ्र बारा बंदी पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यामुळे मिरवणुकीचे वैशिष्ठय़ उठून दिसत होते. ६८ लिंगांना तैलाभिषेक करून रात्री उशिरा ही मिरवणूक उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठात परतली. मिरवणूक मार्गावर यंदा खड्डे झाल्याने महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी युद्धपातळीवर बहुसंख्य खड्डे बुजवून नवीन रस्ते तयार केल्यामुळे मिरवणुकीला कोणतीही बाधा पोहोचली नाही.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी उद्या बुधवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलाव परिसरातील संमती कट्टय़ावर अक्षता सोहळा संपन्न होणार आहे.
 

Story img Loader