सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला शनिवारी मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली. सात उंच नंदिध्वजांच्या मिरवणुकीने शहराच्या पंचक्रोशीतील ६८ शिवलिंगांना तैलाभिषेक होऊन यात्रेला प्रारंभ होताना त्यात लाखो भाविक सश्रद्ध भावनेने सहभागी झाले होते. ही यात्रा १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. उद्या रविवारी होणारा अक्षता सोहळा यात्रेतील प्रमुख आकर्षणाचा भाग मानला जातो. या यात्रेला नऊशे वर्षांची परंपरा लाभली आहे.
बाराव्या शतकात होऊन गेलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या लग्न सोहळ्यावर आधारित यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात. श्री सिद्धेश्वर महाराज थोर समाज सुधारक होते. तेवढेच ते शिवयोगी होते. त्यांची भक्ती करणाऱ्या एका कुंभारकन्येने त्यांच्याशी विवाह करण्याचा अट्टाहास केला असता शेवटी सिद्धेश्वर महाराजांनी आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास संमती दिली. पहिल्या दिवशी सर्व देवादिकांना आमंत्रण, दुसऱ्या दिवशी अक्षता सोहळा, तिसऱ्या दिवशी नववधू कुंभारकन्येचा अग्निप्रवेश अशा प्रसंगांवर आधारित यात्रा होते, सकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून सिद्धेश्वरांची पालखी आणि सात उंच नंदिध्वज मिरवणुकीने निघाले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह भाजपचे आमदार विजय देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा – सोलापूर : १५ हजार असंघटित कामगारांना घरे; हस्तांतरणासाठी पंतप्रधान मोदींचा दौरा नियोजित
पांढराशुभ्र पारंपारिक बाराबंदीचा पोशाख परिधान केलेल्या हजारो भाविकांनी ‘एकदा भक्तलिंग हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’चा घोष केला. विजापूर वेशीत स्थानिक मुस्लीम बांधवांनी पालखीसह नंदिध्वजांच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली. ही मिरवणूक पारंपारिक मार्गावरून दुपारी सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली आणि नंतर सिद्धेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात स्वतः प्रतिष्ठापना केलेल्या ६८ शिवलिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी नंदिध्वज निघाले. रात्री उशिरा तैलाभिषेक करून नंदिध्वज हिरेहब्बू वाड्यात परतले. यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगणातील भाविक सोलापुरात दाखल होत आहेत.