Siddhivinayak Bidwalkar Murder Case Vaibhav Naik : शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिद्धीविनायक बिडवलकरच्या हत्येप्रकरणी अनेक मोठ्या नेत्यांवर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी दावा केला आहे की, जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली असून बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था वाईट आहे. अवघ्या २२ हजार रुपयांसाठी सिद्धीविनायक बिडवलकरची हत्या करण्यात आली. सिद्धेश शिरसाटने हा खून पचवण्यासाठी राजकीय पक्षाचा आश्रय घेतला असून त्याचा आका कोण आहे? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

वैभय नाईक यांनी काही वेळापूर्वी मुंबईत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “सिद्धीविनायक बिडवलकर हा एक गरीब तरुण होता, त्याने २२ हजार रुपये दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण केली. अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. ही हत्या दोन वर्षांपूर्वी झाली होती. सिद्धेश शिरसाट हा या हत्येमागील प्रमुख आरोपी असून त्याने दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे. हा खून पचवण्यासाठी त्याने लोकसभा व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं (शिंदे) काम केलं. स्थानिक आमदार निलेश राणे यांच्यासाठी तो काम करत आहे.”

वैभव नाईकांचा रोख कोणाकडे?

शिवसेना (ठाकरे) नेते वैभव नाईक म्हणाले, “माझी मागणी आहे की सिद्धीविनायक बिडवलकरची हत्या करणारा सिद्धेश शिरसाट व त्याच्या सहकाऱ्यांना वाचवायला कोणी कोणी पोलिसांना फोन केले, कोणी राजकीय दबाव टाकला याची माहिती समोर आली पाहिजे. पोलिसांवर कोणी दबाव टाकला, सिंधुदुर्ग पोलिसांना कोणी फोन केले हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासलं पाहिजे. या हत्येनंतर सिंधुदुर्ग पोलीस तपास करत होते, मात्र जिल्हा नियोजनाच्या बैठकीत नितेश राणे म्हणाले, दोन वर्षांचे गुन्हे का तपासताय, त्यानंतर तपास थांबवण्यात आला. या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत.”

“सिद्धीविनायकच्या मारेकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून कोण पाठिशी घालतंय. या गुन्हेगारांचा आका कोण आहे हे गृहमंत्र्यांनी शोधावं. अशी प्रकरणं याआधी देखील झाली आहेत. मात्र मारेकऱ्यांनी ते खून पचवले. सिंधुदुर्गची बीडपेक्षा वाईट अवस्था झाली आहे”, असंही वैभव नाईक यावेळी म्हणाले.