नागपूर : पक्ष्यांवर सातत्याने ध्वनी प्रदूषणाचा मारा होत असेल तर त्यांच्या शरीरविज्ञानात आणि पुनरुत्पादक यंत्रणेत बदल घडून येतो. शांत ठिकाणी अधिवास असणाऱ्या पक्ष्यांपेक्षा शहरातील पक्ष्यांना होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरील अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे. ‘कॉन्झर्वेशन बायोलॉजी’ या पत्रिकेमध्ये हा निष्कर्ष प्रकाशित झाला आहे.

ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या तणाव संप्रेरक पातळीत वाढ होते. आरोग्य आणि पुनरुत्पादक आरोग्यात बदल होतो. मध्य ऑस्ट्रेलियातील पक्ष्यांच्या अधिवासात हा अभ्यास करण्यात आला. एकूण ८८ पक्ष्यांना दोन गटात विभाजित करून हा अभ्यास करण्यात आला. आवाजाच्या आणि आवाज नसलेल्या ठिकाणांमधील पक्ष्यांवर हा अभ्यास झाला. ध्वनी प्रदूषणाच्या ठिकाणी असलेले पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेवरही दुष्परिणाम झालेला दिसून आला. दिवसभरात जड वाहतुकीचे आवाज आणि रात्री कमी आवाज अशा स्थितीचाही अभ्यास करण्यात आला. पहिल्या प्रजनन कालावधीनंतर असे दिसून आले की दोन्ही गटांसाठी आवाजाची परिस्थिती बदलली आणि त्याच पक्ष्यांच्या जोडय़ा पुन्हा तयार झाल्या. संशोधकांनी प्रजननापूर्वी, दरम्यान आणि नंतर तणाव संप्रेरकांची पातळी नोंदवली. त्यांनी पक्ष्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य आणि पुनरुत्पादक यश तसेच त्यांच्या पिलांच्या वाढीचा उपाय देखील या अभ्यासात नमूद केला आहे. सतत आवाज असणाऱ्या परिसरात राहणारे पक्ष्यांच्या प्रजननादरम्यान त्यांच्या रक्तातील तणावाच्या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे संशोधकांनाही आश्चर्य वाटले. संशोधकांच्या मते पक्ष्यांमध्ये आढळणारी संप्रेरकांची पातळी ही एक नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया असू शकते. शांत वातावरणात जन्मलेला पिलांची वाढ व्यवस्थित होती. रासायनिक प्रदूषण, प्रकाश प्रदूषण आणि शहरी भाागात आढळणाऱ्या इतर अनेक गोष्टींचा पक्ष्यांवर होणारा परिणाम यात अभ्यासण्यात आला.