अकोला : शिवसेना नेते व आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे, त्यांना राज्य सरकार अस्थिर करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिकांचा विचार करून एकनाथ शिंदे व आमदारांनी परत यावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.
आमदार देशमुख यांनी अकोल्यात परतल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे. भाजपमध्ये धमक असेल, तर निवडणुका लावाव्या व जनतेसमोर जावे. आता निवडणूक व्हावी, अशी माझी इच्छा आहे. जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देतील. मी सच्चा शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे.’
एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाने सर्व काही दिले. पक्षवाढीसाठी त्यांनीही भरपूर परिश्रम घेतले. सर्व आमदारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शिंदे व सर्व आमदारांना माझी विनंती आहे की, उद्धव ठाकरे, शिवसैनिक आणि मतदारसंघातील मतदारांचा विचार करून परत यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शिंदे यांनी सादर केलेेल्या पत्रावरील आपली स्वाक्षरी नसल्याचे आ. देशमुख म्हणाले. आपली स्वाक्षरी इंग्रजीत असून त्या पत्रावर बोगस स्वाक्षरी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बच्चू कडू परत येतील
राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट झाली. त्यावेळी कडू यांनी, उद्धव ठाकरे अतिशय चांगले नेते असून असे व्हायला नको, अशी प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त केली. जे काय होत आहे ते चुकीचे आहे, असे त्यांचे मत आहे. मी ज्या पद्धतीने निसटलो, त्याच पद्धतीने राज्यमंत्री बच्चू कडू परत येतील, असा विश्वास आ. देशमुख यांनी व्यक्त केला.