प्रसेनजीत इंगळे
शासन वा सामाजिक संस्थांच्या वतीने गेल्या आठ महिन्यांत रक्तदान शिबीरे न भरविल्याने आणि करोनासंसर्गाच्या भीतीने नागरिकांनीही पुढाकार न घेतल्याने वसई-विरार शहरात भविष्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास गरजू रुग्णांना रक्त पुरवणेअशक्य होईल, अशी चिंता वसईतील रक्तपेढय़ा व्यक्त करीत आहेत.
करोनाकाळात रक्तदाते मोठय़ा संख्येने पुढे आले नाहीत, ही बाब आहेच. त्यातही फारच कमी रक्तदान शिबिरे भरविण्यात आली. त्याच वेळी
स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम हाती घेण्यात आले नाहीत. त्यामुळे दिवसागणिक शहरातील रक्ताचा तुटवडा वाढत चालला आहे. काही रक्तपेढय़ांकडून रक्तदात्यांना विनंती केली जात आहे. काही रुग्णालयात वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याचे या क्षेत्रातील एका कार्यकर्त्यांने सांगितले. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर २२ ऑक्टोबर रोजी वसई-विरारमधील रक्तपेढीत उपलब्ध असलेला रक्तसाठा कमालीचा खालावल्याचे दाखविण्यात आले आहे. सामान्य रक्तगट असलेल्या ‘ओ’ आणि ‘बी पॉसिटिव्ह; गटातील रक्तही मिळणे कठीण होत असल्याबद्दल एका रक्तपेढीच्या चालकाने सांगितले.
वसई-विरारमध्ये एकूण केवळ तीनच रक्तपेढय़ा आहेत. सध्या सर्वच रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने रक्ताची तितकीशी मागणी नाही.
रक्तदात्यांच्या रक्तातील वर्गवारी होत असताना ‘होल ब्लड सेल’, प्लेटलेटस् आणि सिंगल डोनर प्लेटलेट्स असे विभाग केले जात असते. त्यामुळे युनिटस्ची संख्या अधिकच कमी होत जाते. सध्या अनेक रुग्णालयात रक्त मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
६००
रक्तपिशव्यांची महिन्याकाठी शहराला गरज
१५०
युनिटस् रक्ताचा सद्यस्थितीत रक्तसंचय
७०९
डायलिसीस रुग्णसंख्या
नालासोपारा येथील एका रक्तपेढीने दिलेल्या माहितीत थॅलेसेमिया, डायलिसीसच्या रुग्णांना सर्वाधिक रक्ताची गरज असते. याशिवाय गर्भवती आणि कर्करोग रुग्णांसाठी आगाऊ रक्ताची नोंदणी करावी लागते.
अडचण काय?
एखादे रक्तदान शिबीर भरविल्यास तिथे एकदा करोना रुग्ण आढळ्यास संपूर्ण शिबीर वाया जाते. करोनाकाळात नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नाहीत. यामुळे सामाजिक संस्था, महानगरपालिका, राजकीय पुढारी, रुग्णालये यांनी पुढाकार घेवून रक्तदान शिबिरे भरविणे गरजेचे आहे, असे ‘डॉक्टर असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. संजय मांजलकर म्हणाले.
पालिकेची रक्त साठवणूक पेढी वर्षभरापासून बंद वसई-विरार महापालिकाने एस बी टी सी (राज्य रक्त संक्रमण परिषद) माध्यमातून वसईच्या सर डी एम पेटीट रुग्णालयात रक्त साठवणूक पेढीची सुरुवात केली होती. पण मागील वर्षभरापासून ही पेढी बंद आहे. या संदर्भात पालिकेने माहिती दिली की, एस बी टी सीकडून रक्तपुरवठा बंद झाल्याने ही पेढी बंद आहे. वसई विरार महानगर पालिकेने स्वत:ची रक्तपेढी काढण्याचे योजले होते. परंतु, हा प्रकल्प अजूनही केवळ कागदावरच राहिल्याने. या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उपाआयुक्त विजय द्वासे यांनी सांगितले.