आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते, असे संकेतही दिले. तसेच, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असून, या बैठकीनंतर कदाचित या संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत.

“आज मुख्यमंत्री सांयकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्या मिटींगच्या अनुषंगाने कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य होऊ शकतात. असा या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्या दृष्टीने एक साधारण चर्चा झाली आहे.” असं आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले.

माध्यमांना बैठकी संदर्भात माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, “प्रामुख्याने पंचसूत्री जी आहे त्यानुसार कार्यवाही आपण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने आम्ही असं ठवरलं आहे की, पहिलं सूत्र म्हणजे तपासण्या, तर आज आपण २५ हजारांपर्यंत दररोज तपासण्या करत आहोत. ही २५ हजारांची तपासणी आम्ही निश्चितपणे वाढवू. कारण, किरकोळ स्वरुपात… महाराष्ट्र हे तसं जर पाहिलं तर मी म्हणेण खूप सुरक्षित झोनमध्ये आहे. चिंता करण्याची परिस्थिती अजिबात नाही आणि घाबरण्याचं देखील काही कारण नाही. याचं कारण म्हणजे ९२९ आज अॅक्टीव्ह केसेस आहेत, महाराष्ट्राने एका एका दिवशी ६५ ते ७० हजार केसेस बघितलेल्या आहेत. त्यामुळे एकंदर पर मिलियनमध्ये आपण खूप खाली आहोत. कारण, पर मिलियन अॅक्टीव्ह केसेसमध्ये मिझोराम-६३५ आहे. दिल्ली – २४८, केरळ – ८२ आहे, हरियाणा -७३, उत्तराखंड -४४, कर्नाटक-२८ आहे. परंतु महाराष्ट्र मात्र पर मिलियन केसेसमध्ये केवळ सात आहे. म्हणजेच दर दहा लाखांमागे महाराष्ट्रात सात केसेस आहेत. त्यामुळे आज असा एकदम काळजी सारखा नक्कीच विषय नाही, एवढ मी जरूर सांगेन.”

तसेच, “काळजी घ्या आणि कार्यवाही करा या संदर्भात ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये टेस्टिंग आम्ही नक्कीच वाढवू, ट्रॅकींग करू आणि गरजेप्रमाणे निश्चित उपचार करू. त्याचबरोबर जर काही पॉझिटिव्ह आढळले तर ज्याबाबात जे जिनोमिंक सिक्वेन्सिंग आहे, ते देखील करायला सांगितलं. कारण, आपल्या देशात तरी ओमायक्रॉनच सर्वदूर आहे. जरी त्याचे काही व्हेरिएंट्स जरी असले तरी, ते ओमायक्रॉनचेच खऱ्या अर्थाने भाग आहेत. म्हणून तसा काही वेगळा व्हेरिएंट निर्माण झालाय, असा काही भाग नाही. परंतु तरी देखील जिनोमिक सिक्वेन्सिंग करायला सांगितलं आहे, ते देखील आम्ही करू.” अशी देखील माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली.

याचबरोबर, “सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लसीकरणाचा त्यामध्ये देखील आपण वाढ करणार आहोत. हे आजच्या बैठकीत ठरवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सहा ते १२ वयोगटासाठी लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता हे महाराष्ट्रासमोर पुन्हा एक मोठं काम, निश्चितप्रकारे आहे. त्या संदर्भातील विसृत नियमावली अद्याप पाठवलेली नाही. जसे ते येतील त्याची अंमलबजावणी राज्याच्या आरोग्य विभागाकडून केली जाईल. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवावंच लागणार.” असंही राजेश टोपेंनी सांगितलं.

Story img Loader