मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून विधानसभा लढवणार असल्याचे मानले जात असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच सातारा जिल्ह्यातील निम्म्या जागांवर काँग्रेस दावा करणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार आनंदराव पाटील यांनी कराड दक्षिण, वाई व माण-खटावसह अन्य एक जागा अशा जिल्ह्यातील ४ जागा काँग्रेस मागणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात विकासकामे मार्गी लावण्यासाठी मोठय़ाप्रमाणात निधी आणण्यात आला आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे. तरी, जिल्ह्यातील निम्म्या जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत असे ते म्हणाले. सध्या कराड दक्षिण वगळता अन्य मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष आमदार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसने निम्म्या जागांवर हट्ट धरल्यास ऐन निवडणुकीत आघाडींतर्गत संघर्षांची स्थिती फेटाळता येणार नाही.

Story img Loader