गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची ‘गद्दार’ म्हणून अनेक शिवसैनिकांकडून संभावना केली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी “गद्दार म्हणू नका, नाहीतर आमचे शिवसैनिक कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही”, असं विधान केलं. या विधानाचे पडसाद आता उमटू लागले असून शिवसेनेच्या समाजमाध्यम समन्वयक अयोध्या पोळ-पाटील यांनी संतोष बांगर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते संतोष बांगर?
सुरुवातीच्या काळात बंडखोरांवर टीका करणारे संतोष बांगर नंतर स्वत:च शिंदे गटात सामील झाले. यावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना तोंडसुख घेतलं. “आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही”, असं ते म्हणाले आहेत.
“भायखळ्यातूनही धमक्यांचे फोन आले”
दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना शिवसेनेच्या समाजमाध्यम समन्वयक अयोध्या पोळ-पाटील यांनी संतोष बांगर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “ते म्हणत आहेत की आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणायचं नाही. जर असं कुणी म्हणत असेल, तर आमचे शिवसैनिक त्यांच्या कानाखाली आवाज काढतील. पण मला धमक्या फक्त बांगरांकडूनच नाही तर स्थानिक आमदारांकडूनही आल्या आहेत. मी जेव्हा बालाजी कल्याणकरांचं नाव घेऊन पोस्ट लिहिल्या, तेव्हा मला भायखळ्यातून फोन आले. तुम्ही आमच्या मॅडमबद्दल लिहायचं नाही असं सांगितलं गेलं. मी तर तोपर्यंत सुरुवातही केली नव्हती. पण मला करू नको म्हटलं तर मी ते सगळ्यात आधी करते”, असं त्या म्हणाल्या.
“…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा धमकीवजा इशारा
“जास्तीत जास्त काय करतील? जीव घेतील”
दरम्यान, आपण धमक्यांना बळी पडणारे नसल्याचं अयोध्या पोळ-पाटील यांनी यावेळी सांगितलं. “करून करून काय करतील? हातपाय तोडतील किंवा जीव घेतील. माझे आई-वडील अभिमानाने म्हणतील की मुलीनं शिवसेनेसाठी स्वत:चा जीव दिला. माझ्यासारखी लकी कुणीच नसेल. कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा गोष्टींना बळी न पडलेल्यांची नावं घेतील, तेव्हा माझं नाव घेतील. मी अशा धमक्यांना घाबरणारी नाही”, असं अयोध्या यावेळी म्हणाल्या.
“जीव गेला तरी बेहत्तर, पण…”
“मला भायखळ्यातून धमक्या आल्या, तेव्हा मी सेनाभवनला गेले होते. तेव्हा मी आदित्य ठाकरेंच्या कानावर ही गोष्ट घातली. माझी उद्धव ठाकरेंसोबतही बैठक झाली, तेव्हाही मी त्यांना ही बाब सांगितली. जीव गेला तरी बेहत्तर, पण मी पक्षाची बाजू मांडायचं सोडणार नाही”, असा निर्धार अयोध्या यांनी व्यक्त केला आहे.