महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गुणांच्या आधारे पराभूत झाल्यानंतर जास्त चर्चेत आलेल्या सिकंदर शेख याने मोहोळ तालुक्यात टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कुस्ती मैदानावर पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यास अवघ्या सात मिनिटांत एकचाकी डावावर लोळविले. त्याला मानाचा भीमा केसरी किताबासह रोख रक्कम व चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने पंजाबच्या गोरा अजनाला यास आस्मान दाखविले.
भीमा साखर कारखान्याचे संस्थापक भीमराव महाडिक यांच्या स्मरणार्थ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या या कुस्ती मैदानावर सिकंदर शेख विरूध्द भूपेंद्रसिंह अजनाला आणि महेंद्र गायकवाड विरूध्द गोरा अजनाला यासह प्रमुख पाच लढती झाल्या. इतर लहान-मोठ्या शेकडो कुस्त्याही झाल्या. यावेळी हजारो कुस्ती चाहते उपस्थित होते. सिकंदर शेखच्या लढतीविषयी सर्वाना उत्सुकता होती.
पहिल्या क्रमांकाच्या भीमा केसरी किताबासाठी सिकंदर शेख व भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात झालेल्या लढतीसाठी हिंदकेसरी दीनानाथसिंह आणि सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी गाजलेले मल्ल अफसर शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी स्वागत केले.
हेही वाचा- “कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे”, रामदास आठवलेंची भूमिका
रात्री ९.३५ वाजता सिकंदर शेख व भूपेंद्रसिंह यांच्या लढतीला सुरूवात झाली. सुरूवातीपासून वेगवान झालेल्या कुस्तीने रंग भरला होता. पहिल्या भूपेंद्रसिंह हा सिकंदरच्या तुलनेत अधिक अनुभवी,उंचापुरा आणि वजनाने बलदंड होता. पहिल्या दोन मिनिटांत भूपेंद्रसिंहने चपळाईने एकेरी पट काढत सिकंदरला खाली खेचून त्याच्यावर सवारी भरली. परंतु त्यातून सिकंदरने सुटका करून घेतली आणि नंतर पुन्हा भूपेंद्रसिंहने एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला. तेव्हा चित्त्याची चपळाई दाखवत सिकंदरने प्रतिडाव टाकून एकचाकी डावाने भूपेंद्रसिंहला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. तो त्याने परतावून लावला तरी सातव्या मिनिटाला सिकंदरने पुन्हा एकेरी पट काढून भूपेंद्रसिंह खाली खेचले आणि काही क्षणातच त्याच्या मानेवर भार टाकला. शक्ती, बुध्दी आणि चपळता या जोरावर सिकंदरने एकचाकी डाव टाकला. यात प्रतिस्पर्धी भूपेंद्रसिंह खाली बसल्यावर त्याच्या एका पायाचा मेटा उचलून, एक हात त्याच्या कंबरेच्या वरून आणि दुसरा हात कंबरेच्या खालून धरले आणि काही क्षणातच संपूर्ण ताकदीने त्याला फेकून दिले. यात भूपेंद्रसिंह पाठीवर पडताच सिकंदरच्या विजयाचा एकच जल्लोष सुरू झाला. कुस्ती चाहत्यांनी मैदानावर येऊन सिकंदरला उचलून खांद्यावर घेतले.
हेही वाचा- चिंचवड पोटनिवडणूक: “उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य”; शंकर जगताप यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदरला गुणांच्या आधारे पराभूत केलेल्या उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि पंजाबच्या गोरा अजनाला यांच्यात झालेली दुसऱ्या क्रमांकाची लढत एकतर्फी ठरली. गोरा अजनाला यास घिस्सा डाव टाकून महेंद्रने खाली खेचल्यानंतर गोराच्या गुडघ्यास मुक्कामार लागला आणि तो जायबंदी झाला. त्याने काही वेळ विश्रांती घेऊन पुन्हा मैदानावर आला. परंतु महेंद्रने सहजपणे त्याला चारीमुंड्या चित केले. त्याला भीमा वाहतूक केसरीचा किताब मिळाला.