कुटुंबीयांचा विरोध असतानाही निवृत्तीनंतर नोकरी करणाऱ्या जसपालसिंग धिल्लन यांनी येत्या काही महिन्यांत राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांना नक्षलवाद्यांच्या गोळीला बळी पडावे लागले. धिल्लन यांना ठार करून नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच शीख समुदायाला लक्ष्य केल्याने उद्योगधंद्याच्या निमित्ताने पंजाबातून येथे स्थायिक झालेल्या या समाजात सध्या बरीच अस्वस्थता आहे.
लॉयड स्टील कंपनीच्या खाण विभागाचे उपाध्यक्ष असलेले धिल्लन यांची गेल्या बुधवारी नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील सूरजागडजवळ गोळ्या घालून हत्या केली. गुरुवारी सकाळी ही हत्येची बातमी समजताच येथे मोठय़ा संख्येने असलेल्या शीख समुदायात अस्वस्थता पसरली. बल्लारपूर पेपरमिलमध्ये बांबू विभागात सलग ३० वर्षे नोकरी केल्यानंतर धिल्लन या शहरातील शास्त्रीनगरात वास्तव्यासाठी आले होते. हत्येची बातमी समजताच या समुदायातील अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. धिल्लन यांचे पार्थिव शुक्रवारी दुपारी येथे आणण्यात आले. त्यावर उद्या, रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. धिल्लन यांची मुलगी अमेरिकेत राहते. ती उद्या सकाळी येथे येणार आहे. निवृत्तीनंतर धिल्लन यांनी शास्त्रीनगरात घराचे बांधकाम सुरू केले होते. सध्या ते अपूर्ण आहे. त्यांचा मुलगा मनप्रितसिंग येथे व्यवसाय करतो. पंजाबातील होशियारपूर जिल्ह्य़ात मूळ गाव व शेती असलेल्या धिल्लन यांचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्ताने येथे स्थलांतरित झाले. त्यांचे वडीलही पेपरमिलमध्ये नोकरीला होते.
नोकरीचा संपूर्ण काळ बांबू वाहतुकीच्या निमित्ताने जंगलात घालवणाऱ्या धिल्लन यांनी आता निवृत्तीनंतर तरी नोकरी करू नये, असे कुटुंबीयांचे म्हणणे होते. पेपरमिलमध्ये बांबू विभागात काम करताना धिल्लन यांना इच्छा नसतानाही नक्षलवाद्यांना हाताळावे लागले. ही बाब कुटुंबाला ठाऊक होती. म्हणूनच आता निवृत्तीनंतर पुन्हा तीच गोष्ट करण्यास घरातून विरोध होता. त्याला न जुमानता धिल्लन यांनी लॉयडची नोकरी स्वीकारली. त्यानंतरही त्यांच्यावर नोकरी सोडण्यासाठी कुटुंबातून दबाव कायम होता. एक महिन्यापूर्वीच त्यांनी हा दबाव लक्षात घेऊन येत्या काही महिन्यात राजीनामा देण्याची बाब बोलून दाखवली होती, असे त्यांचे बंधू अजितसिंग धिल्लन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मात्र, त्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी त्यांचा जीव घेतल्याने संपूर्ण शीख समुदायात हळहळ व्यक्त होत आहे. उद्योगधंद्याच्या निमित्ताने पंजाबातून येथे स्थायिक झालेल्या शिखांची संख्या बरीच मोठी आहे. आरंभीच्या काळात जंगल ठेकेदारी करण्यात हाच समुदाय आघाडीवर होता. नंतर या समुदायातील बरेच लोक वाहतूक व्यवसायात शिरले. आम्ही जेव्हा जंगल ठेकेदार म्हणून काम करत होतो तेव्हा गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रश्न नव्हता. आता ही ठेकेदारी संपुष्टात आली आहे, असे राजबीर सनवाल यांनी सांगितले. वाहतूक व्यवसायाच्या निमित्ताने समुदायातील अनेकांचा जंगलाशी संबंध येतो. यापैकी काहींचे ट्रक नक्षलवाद्यांनी जाळलेलेही आहेत. मात्र, आजवर कधीही नक्षलवाद्यांनी या समुदायातील व्यक्तीला ठार केलेले नव्हते. धिल्लन यांच्या हत्येमुळे पहिल्यांदाच हा प्रकार घडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा