राहाता : चीन विरोधात आम्ही सर्वपरीने तयार असून, सिक्कीम सीमावर्ती राज्य असून, चीन-नेपाळ-भूतान अशा तीन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमाशी संलग्न आहे. डोकलाम वादानंतर चीन सीमेचा विषय अधिक संवेदनशील झाला. मात्र, आता शांतता असून, लवकरच मानसरोवर यात्रा सुरू होण्याच्या तयारीत आहे, असे सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी सांगितले. सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी काल, शनिवारी सायंकाळी उशिरा शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गृहनिर्माण व कामगार, श्रमिक मंत्री भीम हांग लिंबू, विधानसभा अध्यक्ष एम. एन. शेरपा, विधानसभा उपाध्यक्ष राज कुमारी थापा तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकारी उपस्थित होते. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी चीनविरोधात आम्ही सर्वपरीने तयार असल्याचे स्पष्ट करीत अलीकडेच उत्तर सिक्कीम हिमालय पार तिबेट पठारावर भारतीय सैन्याने पहिल्यांदाच शक्तिप्रदर्शन केले, ही बाब कौतुकास्पद आहे. २०१४ नंतर सैन्यदल मजबूत झाले असून, शक्तिशाली झाले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कामाला संपूर्ण पाठिंबा असून, भाजप हा मोठा भाऊ आहे. पंतप्रधान मोदी सिक्कीमवर खूप प्रेम करत असल्याने त्यांना मोठा भाऊ मानतो.

लहान होतो तेव्हापासून साईबाबांचा मी भक्त आहे. मात्र, कधी शिर्डीला येणे झाले नाही. साईबाबांचे बोलवणे आल्याने आपले शिर्डीला साईदर्शनासाठी पहिल्यांदाच येणे झाले आहे. दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणार आहे. अशी इच्छा यावेळी मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी व्यक्त केली. सिक्कीम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात साईबाबांचं मंदिर आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला.