मागील पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी एसटी कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले, शिवाय अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटकही झाली. त्यानंतर न्यायालयीन सुनावणीत सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली असून, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारतोय की आपल्या बंगल्यावरती देखील मोर्चा येणार, त्यावेळेस पोलीस बंदोबस्त हा नेहमीच त्या ठिकाणी आहे. इतरांच्या बंगल्यावरती आणि इतर जे राहतात, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात यावा असे आदेश आपण दिलेले आहे का? दिले असतील तर ज्यांनी ज्यांनी या आदेशाचं पालन केलं नाही, त्याविरोधात आपण काय करणार हे पहिल्यांदा सांगा.”

तसेच, “दुसरं म्हणजे हे जर आदेश दिले नसतील, तर मग हे आदेश का दिले नाहीत याचा देखील खुलासा जनतेसमोर झाला पाहिजे. आणखी एक महत्वाचं म्हणजे, नांगरे पाटील यांच्याकडे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याचा देखील खुलासा करावा, नांगरे पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली नाही किंवा हे असणारं पत्रक नांगरे पाटील पोलीस आयुक्तासमोर देखील घेऊन गेले नसतील आणि म्हणून पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना सांगताना हे दाखवलं नसेल अशी देखील शक्यता आहे, मी नाकारत नाही. पण मग प्रश्न हा उपस्थित होतो, की ज्या अधिकाऱ्याची जबाबदारी होती, सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवणं अधिक गुप्त माहिती घेणं, हे का केलं नाही? याचा खुलासा करण्यात यावा.” असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

याचबरोबर, “पुन्हा जी चौकशी झालेली आहे, त्या चौकशीचं प्रमुख तुम्ही नांगरे पाटील यांनाच कसं केलं? ज्यांनी जबाबदारी पार पाडली नाही. ज्यांनी हे पत्र लपवलं, त्याचाचवरती असणाऱ्या चौकशीची जबाबदारी कशी दिली? यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. शिवसेनेचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज आहेत. हे जे पत्र आहे या पत्राचा रोख आपण जर बघितला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून असणारा हा रोख आहे. मग हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे का? पक्षांतर्गत कुरघोडी होताना देखील दिसत आहे आणि दुसरं मित्रपक्षात देखील कुरघोडी होताना दिसत आहे. दुर्दैवाने व्यक्तिगत सुरक्षा देखील आता धोक्यात आली अशी असणारी परिस्थिती आहे. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणं महत्वाचं आहे. असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहोत.” असं प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवले.

Story img Loader