महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गहाळ झाला असल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थानच्यावतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. २०११ सालापूर्वी चांदीचा मुकुट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्याचे तुकडे असा दुर्मिळ आणि पुरातन अलंकाराचा मोठा ऐवज तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सगळीकडेच खळबळ माजली होती. सर्वप्रथम दै. लोकसत्ताने ही बाब अहवालाच्या आधारे चव्हाट्यावर आणली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा केला आहे. पोलीस आता वस्तुस्थितीत नक्की काय? याचा मागोवा घेत आहेत. दरम्यान तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले. सोमनाथ माळी यांनी दिलेल्या तक्रारीत डबा क्र. ७ मधील रेशमासह ४३ भार वजन असलेला चांदीच्या मुकुटाचा अपहार झाला असल्याचे म्हटले आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता.

हेही वाचा… Maharashtra News Live : सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चा निष्फळ

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील एक ते सात डब्यात असलेल्या पुरातन, दुर्मिळ आणि मौल्यवान असलेल्या अलंकारांपैकी १७ अलंकार खजिन्यातून गायब झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार तुळजाभवानी देवीचे महंत आहेत. या चार महंतांपैकी तीन महंत मयत असून महंत चिलोजीबुवा हे एकमेव आरोपी सध्या हयात आहेत. तत्कालीन सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तेही आजघडीला हयात नाहीत. तर पलंगे, असे अडनाव असल्यामुळे नेमके कोणते पलंगे आरोपी, असा संभ्रम सध्या तुळजापूर शहरात निर्माण झाला आहे. तर एक अज्ञात आरोपी असल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या आढाव्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महंत चिलोजीबुवा हेही उपस्थित होते.

गायब झालेले मौल्यवान, पुरातन अलंकार

डबा क्र. १ : मंगळसूत्र, जडावी मोत्यासह, कानजोड जडावी मोत्यासह, छत्रजडावी मोत्यासह त्यात एक छोटा माणिक, चार लहान मोती, तीन लाल मोती असलेली पट्टी जडावी, सहा माणिक खडे असलेली नेत्रजोड जडावी.

डबा क्र. २ : सहा माणिक खडे असलेली नेत्रजडावी 1975 पूर्वी गायब असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

डबा क्र. ३ : एक माणिक असलेली नेत्र जडावी, मंगळसूत्र वाटीतील एक माणिक, एक मोती आणि मंगळसूत्र जडावी सन 2011 पूर्वी गहाळ झाली आहे.

डबा क्र. ४ : 22 भार वजन असलेले चांदीचे खडावजोड ऑगस्ट 2000 च्या आसपास मंदिरातून गायब झाले आहेत.

डबा क्र. ५ : 34 भार वजन असलेले खडावजोड चांदीचे हा पुरातन अलंकार 1981 ते 2000 या कालावधीत महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यातून अपहृत झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

डबा क्र. ६ : मोत्याची नथ (तिचे वजन उपलब्ध नाही) 2011 पूर्वी तीही अपहृत झाली आहे. 31 भार वजनाचा चांदीचा खडावजोड याच कालावधीत लुबाडण्यात आला आहे., 12 पदर व 11 पुतळ्या साखळीसह असलेले 63 भार वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होते. ते 2011 पूर्वी अपहृत झाले आहे.

डबा क्र. ७ : चांदीचे शेवंतीचे फूल, सहा मोती, सोन्याचे तुकडे, तीन खड्यांसह सोन्याची जडावी असलेले तानवटे जोड, तीन हिरवे पाचू असलेला माचपट्टा आणि 43 भार वजन असलेला चांदीचा मुकुट तुळजाभवानीच्या खजिन्यातून 2011 पूर्वी गायब झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silver ornaments and crown of tulja bhavani goddess also missing suspect absconding asj