कर्जत : कर्जत-जामखेडसाठी सीना कालव्याचे रविवारपासून पूर्ण दाबाने आवर्तन सोडले जाणार असून, कुकडीचे आवर्तनही तातडीने सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. कर्जत-जामखेडमधील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळावे, या मागणीसाठी आमदार पवार यांनी शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांच्यासमवेत पुण्यातील सिंचन भवनात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान या संदर्भात उद्या, शनिवारी सीना मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने कुकडी, सीना व घोड कालव्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. पाणी वेळेत न मिळाल्यास चारा पिके, फळबागा व उन्हाळी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. कुकडी कालव्याबाबत कर्जतच्या भूसंपादन प्रस्तावासाठी ४५ कोटी १८ लाख रुपयांची मागणी आहे. हे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याची मागणीही आमदार पवार यांनी केली तसेच चाऱ्या दुरुस्ती, कोळवाडी विभागातील प्रलंबित भूसंपादनाची कामे, प्रत्येक शाखा कालव्याच्या तोंडावर स्वयंचलित गेज मीटर बसवणे, कालव्यांचे अस्तरीकरण, सीना प्रकल्पाची प्रलंबित कामे आदी प्रश्नावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

मागील वेळी कमी दाबाने आवर्तन सोडल्यामुळे करमणवाडी, बारडगाव दगडी, तळवडी, पिंपळवाडी, पाटेवाडी, निमगाव डाकू, दिघी, चौंडी खरवडी, कोपर्डी या भागात पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील सर्वांना पाणी मिळावे यासाठी हेड टू टेल पाणी द्यावे अशी मागणी त्यांनी केली.