सावंतवाडी : कमलपदी तव नमितो माते… जय जय भराडी देवी… भराडी माते नमो नमः अशा मंत्रोच्चाराचा जप करीत.. अपूर्व उत्साह, आणि वैतन्यमयी वातावरणात आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाच्या पहिल्या रात्री भाविकांनी अलोट गर्दी केल्याने आंगणेवाडी भक्तिरसात चिंब भिजून गेली. शनिवारी यात्रोत्सवात रात्री १० वाजल्या पासून १२ वाजेपर्यंत ताटे लावण्याच्या कार्यक्रमापर्यंत भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला तर या यात्रेचा परमोच्च क्षण म्हणून गणला गेलेला ताटे लावणे आणि प्रसाद वाटपाच्या क्षणाने भाविकजण सुखावून गेला, तर आज रविवारी रात्री आंगणेवाडीतील महिलांनी आई भराडी देवीची पूजाअर्चा करीत खणा नारळानी ओट्या भरल्या गेल्या. दोन दिवस चाललेल्या या यात्रोत्सवाची मोड यात्रेने सांगता झाली.
यावर्षीच्या यात्रा काळात, दोन दिवसामध्ये सुमारे १० लाखापेक्षा जास्त भाविकांनी भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होत नवस फेडले आणि बोलले. यात्रोत्सवानिमित्त व्यापारी वर्गाची लाखो रुपयांची उलढाल झाली आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस काल शनिवारी पहाटेपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
काल शनिवारी सायंकाळपासून यात्रोत्सवात भाविकांची गर्दी वाढत जाऊन रात्री गर्दीने उच्चांक गाठला. श्री भराडी देवीच्या मंदिरावर तसेच मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई, साऱ्याचे लक्ष वेधून घेत होती. विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते. तर आंगणेवाडी नगरीही विद्युत रोषणाई व दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली होती. ही विद्युत रोषणाई विजय आंगणे आणि सहकाऱ्यांनी केली होती. रोषणाईतील मंदिराचे देखणे रूप मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागली होती. मंदिर परिसरात भव्य सभामंडप, चलचित्र देखावा साऱ्याचे लक्ष वेधून घेत होता. खाजा-मिठाई, कपडे, भांडी, शोभेच्या वस्तू यासह विविध खाद्य पदार्थांची हॉटेल्स भाविकांनी गजबजून गेली होती. या बरोबरच आकाश पाळणा, मौत का कुव्वा, मुलांसाठी असलेले तर विविध खेळणी व फनी गेम्स या ठिकाणी बच्चे कंपनी व युवा वर्गाने मोठी गर्दी करत आनंद लुटला.
ताटे लावण्याचा सोहळा ठरला लक्षवेधी
भराडी देवीच्या यात्रोत्सवात काल रात्री भक्तांच्या गर्दीचा मोठा उच्चांक लोटला होता. रात्री १० वाजण्याच्या सुमारास देवीला प्रसाद (ताटे) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथम देवीच्या मानकऱ्याची प्रसादाची ताटे देवीच्या प्रांगणात सुहासिनी महिलांनी डोईवर घेत आणली यानंतर ग्रामस्थांनी घरात बनविलेली प्रसादची ताटे देवालयात आणण्यात आली.
आंगणेवाडी यात्रेनिमित्त पेणान्या लाखो भाविकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून सहाजिकच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी प्रशासन, परिसरातील शाळा व कॉलेजच्या मुलांकडून तसेच ग्रामस्थाकडून सोमवारी आंगणेवाडी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. इच्छुक शाळांनी आंगणे ग्रामस्थ मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.