सिंधुदुर्ग पर्यटन विकास साधताना गोवा पर्यटन मॉडेलचा विचार करू नका, असा सल्ला गोवा राज्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर यांनी सिंधुदुर्ग व्यापारी संघाच्या रौप्य महोत्सवी मेळावा उद्घाटन प्रसंगी दिला.
यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार नीलेश राणे, आ. दीपक केसरकर, स्वागताध्यक्ष अण्णासाहेब तांबोसकर, नगराध्यक्ष बबन साळगांवकर, जिल्हा व्यापारी संघ  अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, कार्यवाह प्रसाद धडाम, तालुका व्यापारी संघ अध्यक्ष जगदीश मांजरेकर, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राम भोगले, द्वारका ग्रुपचे द्वारका जालन आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राबद्दलची आपली भावना आदराची आहे असे सांगून श्रीमती काकोडकर म्हणाल्या, गोवा राज्यापेक्षा मोठय़ा क्षेत्रफळाचा सिंधुदुर्ग आहे. या ठिकाणी गोवा राज्यासारखे पर्यटन करू नका. येथील संस्कृती व परंपरा कायम राखणारे पर्यटन ठेवा असे सांगून त्यांनी गोवा राज्य अमली पदार्थामुळे परदेशात बदनाम झालेले आहे.
गोवा राज्यात येण्यासाठी नव्याने प्रवेश कर आकारला जाणार आहे. त्याबाबत सरकारशी बोलू असे सांगताना मत्स्य उद्योगात सिंधुदुर्गला वाव आहे, असे त्या म्हणाल्या. गोवा राज्यात दाबोळी विमानतळ ठेवून मोपा विमानतळ विकसित होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात चिपी विमानतळ विकसित होत असल्याने त्याचा फायदा पर्यटनासाठी होईल असे काकोडकर म्हणाल्या.
यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग गोवा राज्याप्रमाणे पर्यटन विकास केला जाणार नाही. त्यासाठी टाटा कंपनीचा ४८० पानांचा अहवाल बनविला असून, त्या आराखडय़ाप्रमाणेच पर्यटन विकास होईल असे राणे म्हणाले. व्यापारी, उद्योग, व्यवसायामुळे स्वत:च्या प्रगतीसोबतच देश व राज्याची प्रगती होत असल्याने व्यापाऱ्यांनी एकता राखत बदलत्या व्यापार, उद्योगविषयक धोरणाचा आधार घ्यावा असे आवाहन नारायण राणे यांनी केले.
यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले, अन्न सुरक्षा कायद्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. नजीकच्या कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून कृषी उत्पन्न बाजार समिती सेस वसुलीतून सवलत मिळावी असे ते म्हणाले. गोवा मुख्यमंत्र्याकडे सिंधुदुर्ग, कारवार व बेळगाव या सीमावर्ती भागातील वाहनांना प्रवेश करातून वगळण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले.
यावेळी खासदार नीलेश राणे, स्वागताध्यक्ष अण्णासाहेब तांबोस्कर, जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, कार्यवाह प्रसाद धडाम, तालुका अध्यक्ष जगदीश मांजरेकर, द्वारका ग्रुपचे द्वारका जालन, चेबर्सचे रामभाऊ भोगले आदींनी विचार मांडले.
यावेळी श्रीमती नलिनी पेंढारकर, चंद्रकांत शिरोडकर व श्रीमती शकुंतला माळगावकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सतीश सावंत, काका कुडाळकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, आनंद नेवगी, अभय पंडित, बाळ बोर्डेकर व व्यापारी उपस्थित होते.