सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला चारही बाजूंनी नैसर्गिक धोक्याची भीती आहे. मात्र आपत्कालीन यंत्रणा त्याची योग्य ती नोंद घेण्यात कमी पडत आहे. पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव माळीण गावातील नैसर्गिक दुर्घटना पाहता सिंधुदुर्गची आता नैसर्गिक दुर्घटना स्थळे निश्चित करण्याची वेळ आली आहे.
कोकण रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, सह्य़ाद्रीच्या पर्वत रांगा, खाडय़ा, नद्या व बेसुमार वृक्षतोड अशा सर्व पातळीवर बारकाईने अभ्यास केल्यास निसर्ग कोपला तर धोकेच जास्त दिसून येतात.
कोकण रेल्वेमार्ग सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरूच असतात पण याही मार्गावर भीती आहेच. आंबोली, रामघाट, फोंडाघाट, करूळ घाटमार्गावर दरडी कोसळण्याच्या भीतीने लोक त्रस्त आहेत. या नैसर्गिक अपघातात जीवित हानी वेळोवेळी टळली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात वाहतुकीचा खेळखंडोबा उडतो. भंगसाळ, पीठढवळ, बेल नदीला महापुराने वेढले तर महामार्ग बंद पडतो, तर खारेपाटण येथेही पुराच्या धोक्याची भीती असते. या मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात वाहतूक रोखली जाते, पण वाहनधारकांनी दक्षता घेण्याचे प्राधान्य दिल्याने धोके टळले आहेत.
या महामार्गावरील नद्यांना सह्य़ाद्रीच्या पर्वत रांगात कोसळणाऱ्या पावसामुळे महापूर येतो. त्यामुळे महापुराचा धोका सर्वत्र जाणवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन पुलांची उंची वाढविण्यात पुढाकार घेत नाहीत. हे नित्याचेच बनले आहे.
सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगात बेसुमार वृक्षतोड सुरूच असते. केरळी शेतकऱ्यांनी कृषी विकासासाठी लाखो झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यातून माती नदीपात्रात येते. नदीनाल्याची पात्रे गाळाने भरून जाऊन नद्यांचे प्रवाह बदलले आहेत. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात निवास करणाऱ्यांना पावलोपावली धोका जाणवतो. नद्यांच्या महापुराच्या विळख्यात जिल्ह्य़ातील काही मानवी वस्त्या सापडत आल्या आहेत.
मानवी वस्ती डोंगराच्या पायथ्याशी, नद्यांच्या शेजारी आहे, त्यामुळे महापुराचा धोका जाणवत असल्याने प्रशासन नाममात्र स्थलांतराच्या नोटिसा देत प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करते. सागरी आक्रमण हा एक वेगळाच विषय आहे. खाडीपात्रे रुंदावत आहेत, खारे पाणी सागरी किनाऱ्याच्या जवळच्या वस्तीत घुसते.
डोंगर दऱ्याखोऱ्यात बेसुमार वृक्षतोडीसोबतच मायनिंग हे नवे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्य़ातील अनेक भागात खचलेल्या डोंगराचा किंवा खचलेल्या मातीमुळे धोका संभवला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कागदोपत्री घोडे नाचविण्यापलीकडे काही केल्याचे ऐकिवात नाही. आपत्कालीन यंत्रणा हा नाममात्र उपाययोजना भाग म्हणून त्याकडे पाहिले जाते.
जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास होण्यासाठी नैसर्गिक आपत्तीचे धोके जाणून घेण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेने करायला हवा. माळीण गावात निर्माण झालेला धोका पाहता फक्त डोंगराच्या पायथ्याशीच राहणाऱ्यांकडे पाहू नका, असे लोकांचे म्हणणे आहे.
बांदा सटमटवाडीत बेसुमार वृक्षतोड झाल्याने हायवेच्या चौपदरी रस्त्याची भिंत पडून माती रस्त्यावर आली. हे एक साधे उदाहरण ध्यानात घेऊन जिल्ह्य़ातील नैसर्गिक आपत्तीचे धोके टाळण्यासाठी जनतेच्या सहकार्याने यंत्रणेने आराखडा बनवून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्गच्या नैसर्गिक आपत्तीकडे दुर्लक्ष
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला चारही बाजूंनी नैसर्गिक धोक्याची भीती आहे. मात्र आपत्कालीन यंत्रणा त्याची योग्य ती नोंद घेण्यात कमी पडत आहे. पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव माळीण गावातील नैसर्गिक दुर्घटना पाहता सिंधुदुर्गची आता नैसर्गिक दुर्घटना स्थळे निश्चित करण्याची वेळ आली आहे.
आणखी वाचा
First published on: 06-08-2014 at 03:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg disregard of the natural disaster