संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी नंतर निकाल समोर आले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणानंतर ही निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. या हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले असून जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन जोरदार वाद सुरु आहे. मात्र आता भाजपाने या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने अकरा जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघामध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला आहे. तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली पराभूत झाले असून महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे भाऊ असल्याने याठिकाणी भाजपाला धक्का बसला आहे. दरम्यान, भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलला अकरा तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला आठ जागांवर विजय मिळाला आहे.
यावेळी कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली होती. समसमान मतं पडल्यानंतर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष होते. तर औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघातून भाजपाचे गजानन गावडे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या लक्ष्मण आंगणे यांचा पराभव केला आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी हे विजयी झाले आहेत. धुरी यांनी भाजपाच्या गुलाबराव चव्हाण यांचा पराभव केला आहे. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभूत करत भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने १० जिंकत सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण १४ विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे होते. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपाचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत झाली.