सावंतवाडी : गेल्या २४ वर्षांपासून जंगली हत्तींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात उच्छाद मांडला असून शेती व बागायतीचे नुकसान करतानाच माणासावर देखील हल्ला चढवला आहे. दरम्यान हेवाळे गावात नारळाच्या ३० झाडांचे नुकसान केले असून घरासमोर उभी असलेली कार गाडी देखील उचलून टाकण्याचा प्रयत्न हत्तीने केला आहे. मात्र वन विभाग खबरदारीचे उपाय आखत नसल्याने जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावात दाखल झालेल्या जंगली टस्कर राजा हत्तीने प्रंचड दहशत माजवली आहे. अतोनात नुकसान करत असताना वन अधिकारी व कर्मचारी केवळ बघ्यांची भूमिका घेत आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हेवाळे गावात गुरांच्या गोठ्यावर भेलडा माडाचे झाड टाकून लाखो रुपये नुकसान केले. तसेच जंगली हत्तीने हेवाळे बांबर्डे गावात तीस नारळाच्या झाडांचे नुकसान केले. केळी झाडांचे नुकसान करत घरासमोर उभी करून ठेवलेल्या क्रेटा कारचे नुकसान केले.

हेही वाचा – Devendra Fadnavis : “काँग्रेसकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण, भारतरत्नही…”, देवेंद्र फडणवीसांची टीका!

जंगली हत्ती कुठे आहेत. याचा अंदाज घेण्यासाठी दहा लाख रुपये खर्च करून ड्रोन कॅमेरा आणला, तो बंद आहे. त्याचा वापर कश्यासाठी केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय जंगली हत्ती बंदोबस्त करण्यासाठी नेमलेली टीम विनाकामाची आहे. ते फक्त गाडी घेऊन भलत्याच ठिकाणी फिरत असतात खाली उतरत नाही, असे सांगत ज्येष्ठ ग्रामस्थ व्यंकटेश देसाई, माजी सरपंच राजाराम देसाई, तानाजी देसाई, यांनी वन विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून सन २००० च्या सुमारास जंगली हत्ती कळपाने दाखल झाले. त्यादरम्यान हत्तींनी अर्धा सिंधुदुर्ग पालथा घातला होता. सध्या जंगली हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात येऊन जाऊन असतात. शेतकऱ्यांच्या बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आले आहेत. या हत्तींना पकडून नैसर्गिक अधिवासात कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यात सोडून दिले जावे म्हणून मागणी केली जात आहे.

हेही वाचा – Ambadas Danve : “भुजबळ फडणवीसांना भेटतात, पण अजित पवार भुजबळांना भेटत नाहीत, याचा अर्थ…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली, चर खोदण्यात आले, फटाके वाजवून पळवून लावण्याचा प्रयत्न झाला, पण हे तात्पुरते उपाय शेतकरी व बागायतदारांच्या मुळावर येत आहेत. त्यामुळे हत्तींना पकडून नैसर्गिक अधिवासात जेथून आले त्या कर्नाटक राज्यात सोडण्याची मागणी केली जात आहे.

खासदार नारायण राणे यांनी केंद्र सरकार, तर मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg elephant nuisance in hewale village of dodamarg taluka damage to coconut plantations ssb