सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. या महामार्गामुळे २७ एकर जमीन बाधीत होणार असून २० हजार शेतकरी उद्ध्वस्त होतील. कोल्हापूर जिल्ह्यातील ४ आमदार त्यातील दोन मंत्र्यांनी विरोध दर्शविला आहे. बाराही जिल्ह्यातील आमदारांसह सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात भूमिका मांडावी म्हणून आझाद मैदानावर १२ मार्च रोजी आंदोलन छेडण्यात येत आहे असे काँम्रेड संपत देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पश्चिम घाटात पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातून शक्तिपीठ महामार्ग नेण्याचा घाट शासन घालत असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी यासंदर्भात तोंड उघडावे असे आव्हान कॉम्रेड संपत देसाई यांनी येथे दिले.
शक्तिपीठ महामार्ग तब्बल १२ जिल्ह्यातील २७ हजार एकर जमिनीतून जात आहे.या महामार्गाला शक्तिपीठ हे धार्मिक नाव देऊन श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शासनाने घातला आहे. मात्र आमचे रक्त सांडले तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू राहील.हा महामार्ग आम्ही कदापी होऊ देणार नाही. त्यासाठी १२ मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनामध्ये कोकणातील पर्यावरण प्रेमी शेतकरी व जनतेने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कॉम्रेड संपत देसाई यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत यावेळी सहकारी कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, कॉम्रेड सम्राट मोरे,कॉम्रेड मच्छिंद्र मुगडे,कॉम्रेड राजेंद्र कांबळे, शब्बीर मणियार, राजश्री भगत, सिंथिया राॅड्रिक्स, प्रबोधिनी देसाई आदी उपस्थित होते.
कॉम्रेड देसाई पुढे म्हणाले, गेले वर्षभर आम्ही शक्तिपीठ महामार्गाच्या विषयाला हात घालून जनजागृती व विरोध दर्शवण्याचे काम करत आहोत.कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यातून सिंधुदुर्गात हा महामार्ग प्रवेश करणार आहे मुळात पर्यावरणप्रेमी माधव गाडगीळ समिती, कस्तुरी रंग समिती यांच्या अहवालानंतर पर्यावरण दृष्ट्या अति संवेदनशील म्हणून घोषित झालेला ,ज्या भागात पट्टेरी वाघाचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे त्या भागातून हा मार्ग जात आहे त्यामुळे येथील जैवविविधता, पशुपक्षी नामशेष होणार आहे. मुळात अनेक पर्यायी महामार्ग असताना हा महामार्ग केवळ आणि केवळ ठेकेदार आणि त्यासाठी खर्च होणाऱ्या ८६ हजार कोटींच्या कमिशन वर डोळा ठेवून रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे,असा त्यांनी आरोप केला.
ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत या महामार्गाच्या बाजूने बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम शासनाचे दलाल करत आहेत ज्यांची एक इंच ही जागा या महामार्गामध्ये जात नाही ते लोक शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करत आहेत मुळात हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी नाहीच आहे एखाद्याचा डोळा फोडून त्याला चष्मा दान करायचा असला हा भाग आहे मग माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील एका सभेत महामार्ग शेतकऱ्यांना नको असल्यास हा महामार्ग होणार नसल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी महामार्ग रद्दची अधिसूचना काढली होती परंतु हा केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार होता, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आज कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. आता अधिवेशन काळात यावर आवाज उठवला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघातील आंबोली सारख्या अति संवेदनशील भागातून हा रस्ता जात असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार केसरकर हे सुद्धा यावर काही बोलत नाही त्यांनी शक्तिपीठ बाबत तोंड उघडावे व आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्ही विकासाच्या अजिबात आड येत नाही परंतु जो विकास शेतकऱ्यांच्या हिताचाच नाही तो विकास काय कामाचा, विकास हा शाश्वत असावा. शक्तिपीठ सारख्या महामार्गाच्या नावाखाली विकास दाखवून केवळ इंटरेस्टिंग आणि भांडवलदारांचे हित जपण्याचे काम आणि त्यातून स्वतः मलिदा लाटण्याचे काम शासन करत आहे त्यामुळे आमचा या महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे आमचे रक्त सांडले तरी हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.