सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे शेतीच्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे. पण सम्राट खताच्या टंचाईमुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. युरिया खत दोन दिवसांत उपलब्ध होईल असे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्य़ात भातशेतीच्या कामासोबतच फळबागायतींनाही या हंगामात खतांची गरज भासते. शेतकरी वर्गाने यंदाच्या हंगामात प्रथमपासूनच कामांना सुरुवात केली आहे.
सुरुवातीला वळवाच्या पावसाच्या झटक्यातच तरवा पेरणी करणाऱ्यांनी लावणीला प्रारंभ केला, पण काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे तरवापेरणी उशिरा झाली व होत आहे. जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांत भातशेती पीक घेताना वेगवेगळी पद्धत अवलंबली जाते.
जिल्ह्य़ात पाणथळ व भरडी शेती आहे, त्याला खतांची गरज लागते. जिल्ह्य़ातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यांत सम्राट खताची मागणी अधिक असते, तर युरिया खताला जिल्हाभर मागणी असते.
यंदा खतपुरवठा वेळेवर झाला असला तरी सम्राट खताने घोळ केला आहे. मागणीप्रमाणे पुरवठा झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत कृषी संस्था हे खत उपलब्ध करून देऊ शकल्या नाहीत. दोन दिवसांत युरिया खत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सम्राट खत उपलब्धतेसाठी खरेदी-विक्री संघ प्रयत्नशील आहेत.