मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका आचरा नजीकच्या समुद्रात दुर्घटनाग्रस्त होऊन नौकेतील चारही मच्छिमारांनी नौकेतून समुद्रात उडी घेतल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाने पोहत येऊन पहाटे आचरा किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले. मयत झालेल्या तिघांमध्ये नौकामालक व सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन, सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम उर्फ जीजी आडकर यांच्यासह खलाशी प्रसाद भरत सुर्वे (वय ३२), लक्ष्मण शिवाजी सुर्वे (वय ६५) यांचा समावेश आहे. तर विजय अनंत धुरत (वय ५३, रा. मोर्वे देवगड) यांनी किनारा गाठण्यात यश मिळविल्याने ते बचावले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सर्जेकोट येथील गंगाराम उर्फ जीजी आडकर हे काल रविवारी रात्री आपली जनता जनार्दन या नावाची मच्छीमारी पात नौका घेऊन तीन खलाशांना घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते. कुणकेश्वर येथील समुद्रात मासेमारी करून जाळी ओढल्यावर ते माघारी परत असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास धुक्यामुळे नौका हेलकावे घेऊन पाणी भरू लागल्याने जीव वाचविण्यासाठी चौघांनीही समुद्रात उड्या घेतल्या.

हेही वाचा – Devendra Fadnavis : महायुतीत धुसफूस? “मग आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतात”, देवेंद्र फडणवीसांचा शिंदे गटाच्या नेत्याला इशारा

हेही वाचा – Eknath Shinde : “देवेंद्र फडणवीसांवर होणारे आरोप खोटे, मराठा आरक्षणासाठी त्यांनी…”; मनोज जरांगेंच्या ‘त्या’ आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आज सोमवारी पहाटे यातील विजय धुरत हे आचरा बंदर नजीकच्या समुद्रातून पोहत येताना दिसून आले. तर अन्य तिघे मच्छिमार बेपत्ता होते. आज सकाळी हिर्लेवाडी व वायंगणी किनाऱ्यावर तिन्ही बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह सापडून आले. हे मृतदेह आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर पोहत आलेल्या विजय धुरत यांच्यावर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. यावेळी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनीही भेट देत पाहणी केली.