भारताच्या इतिहासात आपले वेगळे स्थान असलेल्या किल्ले सिंधुदुर्गचा भारतीय नौदलासही सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी नौदलाची स्थापना केली. त्यावरून महाराजांची दूरदृष्टी व सागरी सुरक्षेचे महत्त्व दिसून येते. भारतीय नौदलाच्या वतीने ही सागरी सुरक्षा आजही अभेद्य ठेवण्याचे काम केले जात आहे, अशा भावना व्यक्त करताना भारतीय नौदलाच्या ‘निíभक’ युद्धनौकेच्या वतीने कॅप्टन आनंद मुकुंदन व सहकाऱ्यांनी किल्ले सिंधुदुर्गला मानवंदना दिली.
मालवणची शान असलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या ३५०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीने ‘सिंधुदुर्ग महोत्सवा’चे २१ ते २४ एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले. यानिमित्त किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या वतीने केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे केलेल्या विनंतीला मान देऊन संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘निíभक’ युद्धनौकेला ‘किल्ले सिंधुदुर्ग’च्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी मालवण समुद्रात शनिवारी दाखल झाले. ‘निíभक’च्या वतीने शनिवारी रात्री किल्ल्याला सलामी देण्यात आली. ‘निर्भिक’चे कॅप्टन आनंद मुकुंदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. प्रेरणोत्सव समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करताना कवडय़ाची माळ आणि किल्ले सिंधुदुर्गची टोपी भेट म्हणून देण्यात आली. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शिवराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेत माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी ‘शिवशौर्योत्सवा’तील युद्धकलांचा थरार अनुभवत उत्कृष्ट सादरीकरणाबाबत कौतुक केले. भारतीय नौदलाच्या वतीने प्रेरणोत्सव समितीला स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी महोत्सव समिती कार्याध्यक्ष प्रमोद जठार, आमदार वैभव नाईक, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव भोकरे, दुर्ग संवर्धन समितीचे अमर अडके, प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर, ज्योती तोरसकर, श्रीराम सकपाळ, भाऊ सामंत, गणेश कुशे, दत्तात्रय नेरकर, हेमंत वालकर, आप्पा लुडबे, डॉ. आर. एन. काटकर,विकी तोरसकर, जिल्हा दक्षता समिती सदस्य हरी खोबरेकर,विलास हडकर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर आहे. त्यांच्या इतिहासातील ऐतिहासिक असलेल्या किल्ले सिंधुदुर्गला ३५० वष्रे होत असल्याचा अभिमान आहे. तसेच किल्ल्याचे जतन करण्यासाठी किल्ले प्रेरणोत्सव, स्थानिक रहिवासी तसेच शिवप्रेमी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागताने आम्ही भारावून गेलो, अशी प्रतिक्रिया देताना कॅप्टन आनंद मुकुंदन यांनी महाराजांचा गडकिल्ल्यांचे जतन करताना इतिहास जागवला पाहिजे. महाराजांसाठी प्रत्येक शिवप्रेमींनी जोमाने काम करा, असे आवाहनही मुकुंदन यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत कमांडर एन. के. चौरासिया, राजकुमार गुप्ता, राम शंकर, कुंदन सिंह सहकारी उपस्थित होते.