सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ५२ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांत शिवसेना युतीने २५ ग्रामपंचायतींत सत्ता मिळविली आहे. भाजपची भरारी मोठी नसली तरी काँग्रेस विरोधात शिवसेनेने बाजी मारली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत गावागावांत स्थानिक पातळीवरच लढत झाली. मात्र ग्रामपंचायत बालेकिल्ला काँग्रेसचा होता त्याला शिवसेनेने खिंडार पाडले आहे.
जिल्ह्य़ात ५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. शिवसेनेने २५ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींत यश मिळविले आहे. अनेक ग्रामपंचायतींत गाव पॅनेल करून निवडणूक लढविल्या गेल्याने सरपंच विराजमान होतील तेव्हाच राजकीय पक्षांचा दावा खरा ठरेल, असे सांगण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यात १० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांत ८ शिवसेना, तर २ काँग्रेसकडे असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी काँग्रेसची ग्रामपंचायतमधील सत्ता शिवसैनिकांनी उलथवून लावली. कणकवलीमध्ये ३ पैकी २ ग्रामपंचायत काँग्रेस, तर १ शिवसेना, मालवणमध्ये ७ पैकी ५ काँग्रेस, १ शिवसेना व एक गाव पॅनलने जिंकली. वैभववाडीमध्ये ११ पैकी ६ काँग्रेसकडे, तर ५ शिवसेना-भाजपने राखल्या आहेत.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक हे शिवसेनेकडे, तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे हे काँग्रेसचे शिलेदार होते. पण ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय नेत्यांना दूर ठेवत ग्रामीण भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या गेल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण या वेळी मात्र करण्यात आले नव्हते; काही तुरळक प्रकार वगळता निवडणुका शांततेत पार पडल्या. या निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकांना पुढे दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे आर्थिक पुरवठा करून काही ग्रामपंचायतींवर दावा करण्याचे मनसुबे घडू शकतात असे बोलले जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या आजच्या चित्रामुळे केंद्र व राज्याच्या सत्तेची समीकरणे गावात घडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Story img Loader