सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरीक हैराण झाले आहेत तर फळ पिकांचे नुकसान होत आहे. तसेच वादळीवाऱ्यासह पाऊस वरचेवर होत आहे. दरम्यान आज शनिवारी सायंकाळी सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे केळी लागवडीचे नुकसान झाले तर झाडे उन्मळून व मोडून पडली.

बांदा शहर व दशक्रोशीला आज सायंकाळी चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. तब्बल दोन तास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात केळी, पपई, कलिंगड, भाजीपाला शेतीचे अतोनात नुकसान झाले. बांदा पोलीस ठाणे इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. जोरदार वाऱ्याने शहरात तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली. अनेकांच्या दुकानांचे तसेच घरांचे पत्रे उडून गेलेत. मुसळधार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पवसाने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. नुकसानीचे सत्र मोठे असल्याने व पंचनामा झाला नसल्याने नुकसानीचा अधिकृत आकडा समजू शकला नाही.

आज दुपारपासून ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणात उष्मा देखील वाढला होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वारे सुरु झालेत. काही वेळातच विजांच्या गडगडाटात मुसळधार पावसास सुरुवात झाली. जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने सर्वांनीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. तब्बल दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्याने बांदा बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. शहरातील स्थानिक भाजी विक्रेत्यांना देखील पावसाचा फटका बसला. शहरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. गटारांची सफाई केली नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर वाहून आला होता.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बसला. बांदा, मडुरा, निगुडे, वाफोली, डेगवे, नेतर्डे, डिंगणे येथील केळी, पपई, कलिंगड जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना ऐन हंगामात नुकसानीस सामोरे जावे लागले. मडुरा येथील प्रकाश वालावलकर, रोणापाल येथील सुरेश गावडे यांच्या केळी बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा काजू पिकाला देखील फटका बसला. विलवडे येथील प्रसिद्ध भाजीपाल्याला देखील या पावसाचा फटका बसला. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला शेतीचे नुकसान झाले. कलिंगड, पपई, केळीची झाडे देखील उन्मळून पडल्याने नुकसान झाले. पावसात वैरण भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ऐन हंगामात शेती तसेच बागायतीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

बांदा शेटकरवाडी येथील प्रितेश शेटकर यांच्या शेतातील नाचणी पीक आडवे झाल्याने नुकसान झाले. बांदा पोलीस ठाणे इमारतीवरील सिमेंट पत्रे व साधे पत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्याने छप्पराचे व इमारतीचे दोन लाख रुपये नुकसान झाले. बांदा रेडे घुमट नजीक महंमद आगा यांच्या शेत मांगरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले. बांदा तलाठी फिरोज खान यांनी नुकसानीचा पंचनामा केला.

झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत

जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फ़ांद्या तसेच झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. बांदा शहरात देखील पडझडीच्या अनेक घटना घडल्या. अनेक दुकानांचे फलक तसेच साहित्य वाऱ्याने उडून रस्त्यावर आले. मात्र सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. इन्सुली पोलीस तपासणी नाक्याचे बॅरिकेट्स वाऱ्याने उडून गेलेत. काही ठिकाणी झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.