मराठी माणसाची अस्मिता जपतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शांतता व समृद्धी आणण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी केले. यावेळी त्यांनी विरोधक उमेदवारांचा समाचारही घेतला.
सावंतवाडी गांधी चौक येथील जाहीर प्रचार सभेत दीपक केसरकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ, तालुका संपर्क प्रमुख राजू नाईक, विष्णू परब, अॅड. सुभाष पणदूरकर, शंकर कलमानी, अनुराधा देशपांडे, शब्बीर मणीयार, आनारोजीन लोबो व अन्य उपस्थित होते.
माझा पराभव करण्याची पालकमंत्र्यानी जबाबदारी घेऊन वेगवेगळ्या पक्षातून उमेदवार उभे केले आहेत. पण त्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून त्यांना परत पाठवा असे दीपक केसरकर म्हणाले.
सावंतवाडी शहराच्या विकासाप्रमाणेच मतदारसंघात विकास घडविण्यासाठी प्रयत्न करत असताना माझ्या आमदारकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आणि मला न्यायालयात गुंतवून ठेवले गेले. त्यामागे कोण आहेत हे जनतेला माहिती असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. बांदा वाफोलीत नवीन उद्योग आणला. त्यानंतर दुसरे उद्योग मी आणण्याचा प्रयत्न केला असता पालकमंत्र्यांनी विरोध केला असे केसरकर म्हणाले.
आंबोलीतील मेनन कंपनीत गोल्फ कोर्स आणण्यास पुढाकार घेतला, पण तेथेही विरोध केला गेला. आज तरुण गोव्यात नोकरीसाठी जातात, त्यांना या ठिकाणी रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केला, पण त्यालाही सातत्याने विरोध केला. रेडी मायनिंग बंद अवस्थेत होते, ते सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मायनिंगचा एजंट म्हणून बदनाम केले जात आहे, असे केसरकर यांनी सांगून लोकांसाठी निरपेक्ष भावनेने काम करत आहे, असे केसरकर म्हणाले.
राजन तेली व परशुराम उपरकर यांच्यावरही दीपक केसरकर यांनी गंभीर आरोप केले. आता जनतेच्या न्यायालयातून विरोधक उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून लोकांनी त्यांची जागा दाखवून द्यावी. माझे कुटुंब गर्भश्रीमंत असताना माझ्या प्रॉपर्टीबद्दल चर्चा करणाऱ्यांनी  त्यांनी एवढी संपत्ती कोठून जमविली ते सांगावे असे दीपक केसरकर म्हणाले.
सावंतवाडी मतदारसंघात सातशे ते सातशे पन्नास कोटीचा निधी आणून विकास केला आहे. आता ट्रॉमा केअर सेंटर, डायलेसिस मशीन आणून लोकांची सेवा केली जाणार आहे. सर्वागीण विकास व रोजगारासाठी प्रकल्प आणताना विरोध करतानाच श्रेय घेण्याचे प्रयत्न झाले असे दीपक केसरकर म्हणाले.
भाषण सुरू असताना दीपक केसरकर यांना अश्रू अनावर झाले. मराठी अस्मिता व आपला स्वाभिमान दाखवून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोफळे, आनारोजीन लोबो, गोवा राज्य प्रमुख रमेश नाईक, जान्हवी सावंत, शंकर कलमानी, राजू नाईक यांनी मार्गदर्शन केले.
दीपक केसरकर यांनी शहरातून प्रचार फेरी काढत सभेला संबोधित केले.

Story img Loader