सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्य़ात भात, काजू व आंबा यांसारखी महत्त्वाची पिके घेण्यासाठी पीक क्रेडिट धोरण ठरविण्यासाठी मंत्रालयात एक बैठक घेण्यात येईल, असे सांगताना सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या दोन्ही जिल्ह्य़ांत लोकसंख्या वाढत असली तरी स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आयोजित सहकार मेळाव्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री नारायण राणे, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राज्य मत्स्योद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष पुष्पसेन सावंत, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत, विद्याधर अनासकर, डी. बी. वारंग, जि. प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर, नगराध्यक्ष प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सहकाराची गुणात्मक वाढ झाली आहे असे सांगताना पाटील म्हणाले, राज्यात पीक कर्ज असो किंवा सहकार चळवळीच्या उर्जितावस्थेसाठी प्राधिकरण स्थापून संस्थांना स्वायत्तता देण्यासाठी राज्य सहकार खात्याने कायमच पुढाकार घेतला आहे. सामान्य सभासद हाच केंद्रबिंदू मानून ९७व्या घटना दुरुस्तीआधारे नवीन सहकार कायद्याची अंमलबजावणी होणार आहे असे ना. पाटील म्हणाले.
राज्यातील कोणतीही विकास सोसायटी रद्द केली जाणार नाही. तसा अधिकार १९५० च्या कायद्याने नाबार्ड दिला गेलेला नाही, तसेच सहकार संस्थांना माहिती अधिकाराचे बंधन नाही असे ना. हर्षवर्धन पाटील म्हणाले. गटसचिवांना वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगतानाच भूविकास बँकेतील कर्मचाऱ्यांना पगार देण्याबाबतचा सकारात्मक विचार केला जाईल असेही ना. पाटील यांनी जाहीर केले. गटसचिवांना नवीन धोरण आणत आहोत असे ते म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लोकसंख्येत वाढ होत आहे, पण लोकांचे स्थलांतर ही बाब चिंतेची आहे, तसेच शेती ओलिताखाली क्षेत्रातही घट होत आहे. त्यामुळे पुढील काळात भातपीक कर्ज वाढविण्यासाठी जिल्हा समितीने सहकार्य करावे. शिवाय शेतीसाठी पीक क्रेडिट धोरण नाबार्डला बरोबर बदलून क्रेडिट दर वाढवायला हवा. त्यासाठी मंत्रालयात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने बैठक घेऊन अविकसित भागाला जास्त निधी कसा देता येईल याचा निर्णय घेतला जाईल असे ना. हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यात गृहनिर्माण संस्थांची वाढ होत आहे. गृहनिर्माण संस्थांतून घरांची मागणीही वाढत असल्याने गृहनिर्माण संस्थांबाबतही धोरण आखले जाईल असे ना. पाटील म्हणाले.
यावेळी उद्योग तथा पालकमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आपापसातील मतभिन्नता दूर करून विश्वास निर्माण करत सहकार रुजविण्याची गरज आहे. सहकारातून आर्थिक प्रगती व रोजगार उभा करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करू या असे आवाहन केले. पालकमंत्री हटाव हा राजकीय भाग आहे, तसेच आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी वेळ घालविण्यापेक्षा सहकार संस्था उभारून लोकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा, तसेच नोकरी व शिक्षणाची संधी जिल्ह्य़ातच उपलब्ध झाली तर स्थलांतरित संख्या कमी होईल. त्यामुळे विकासाचे परिवर्तन घडविण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्या, असे आवाहन नारायण राणे यांनी केले. यावेळी विद्याधर अनासकर, राजन तेली, सतीश सावंत यांनी मनोदय व्यक्त केला.