सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. सचिन सातपुतेच्या चौकशी नंतर शिवसेनेनं नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवरच आज विधीमंडळात देखील शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी बाजू मांडत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली. तर, त्यांच्या या मागणीवर गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट करत दोषींना सोडलं जाणार नाही, असे स्पष्ट केले.

या प्रकरणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू आज विधानसभेत बोलताना म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक सध्या जी सुरू आहे. त्या बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख संतोष परब ते बँकेचे मतदार देखील आहेत. त्यांच्यावर १८ डिसेंबरला जो एक भ्याड हल्ला झाला. खुनी हल्ला झाला आणि त्याबद्दलची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवलेली आहे. यामध्ये सहा आरोपी सापडले आणि बाकीचे आरोपी अद्यापर्यंत सापडलेले नाहीत. या सभागृहाचे सदस्य त्या विभागाचे आमदार वैभव नाईक आज कणकवली पोलीस ठाण्यात निवेदन घेऊन गेले आहेत की, या सगळ्या परिस्थितीत सहा आरोपी सापडले उर्वरीत आरोपी का सापडले नाहीत.?”

तसेच, “ मी नियम ३५ ची नोटीस काल देऊ शकलो नाही, म्हणून एका सदस्याची नाव घेत नाही. कारण, ज्याचं नाव या केसमध्ये आहे, त्या सदस्याला देखील अटक करावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केलेली आहे. या गंभीर बाबतीत या सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यामध्ये, मला ही माहिती देण्यामागे एकच सांगायचं आहे की संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला त्यात सापडलेले सहा आरोपी, ज्या सदस्याचं नाव घेतलं जात आहे त्यांचा फोन संपर्क क्षेत्राबाहेर असणं आणि मग पोलिसांना हे सापडत नाहीत. मग नेमकं निश्चित संतोष परबच्या या केसमध्ये जे जे म्हणून आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे. म्हणून वैभव नाईक यांनी जी मागणी केलेली आहे, की या सभागृहाचे जे सदस्य आहेत व ज्यांचं नाव याच्याशी जुडलेलं आहे त्यांना अटक करा. याबाबत लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी.” असंही यावळी सुनील प्रभू यांनी सांगितलं.

ज्याचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असेल त्याला सोडलं जाणार नाही – शंभुराज देसाई

यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, “ सुनील प्रभू यांनी जो विषय उपस्थित केला आहे, त्याची गंभीर दखल गृहविभागाने घेतलेली आहे. अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे त्या प्रकरणाचा स्वत: तपास करत आहेत. त्यामधील एका आरोपीस काल दिल्लीतून अटक करून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. आज वैभव नाईक हे जे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षकांकडे गेलेले आहेत, त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले जातील. कुठलाही आरोपी ज्याचा थेट, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष याच्याशी संबंध असेल, त्याला सोडलं जाणार नाही. कोणाचा फोन संपर्कात असेल किंवा संपर्काबाहेर जरी असला आणि जर त्याचा त्यामध्ये संबंध असला, तर त्यावर पोलीस दलाकडून कठोर कारवाई केली जाईल.”

Story img Loader